पुणे : लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक-संशोधक डाॅ. तारा भवाळकर यांची तब्बल सात दशकांनी दिल्ली येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे ७० वर्षांपूर्वी झालेल्या संमेलनाचे अध्यक्षपद भूषविणारे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यानंतर भवाळकर यांना सन्मानाचे अध्यक्षपद मिळाले आहे. साहित्य संमेलनाच्या इतिहासात हा बहुमान संपादन करणाऱ्या भवाळकर या सहाव्या महिला ठरल्या आहेत. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या रविवारी पुण्यातील महाराष्ट्र साहित्य परिषद येथे रविवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला, अशी माहिती साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे यांनी दिली.
संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या स्थापनेनंतर प्रथमच राजधानी दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी अनेक नावे पुढे येत होती. डॉ. तारा भवाळकर आणि विश्वास पाटील यांचे नाव अखेरपर्यंत कायम राहिले. त्यामध्ये भवाळकर यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आले.