डॉ. विश्वंभर चौधरी

बालगंधर्व रंगमंदिर हा पुण्याचा एक सांस्कृतिक मानबिंदू आहे. आरेखनापासून उभारणीपर्यंत स्वत: पुलंनी या वास्तूसाठी खस्ता खाल्ल्या आहेत. नेमकं जन्मशताब्दी वर्षातच बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यासाठी एक पराकोटीचं सांस्कृतिक निर्ढावलेपण लागतं. पुण्याच्या सध्याच्या कारभाऱ्यांनी ते पुरेपूर कमावलं आहे असं दिसतं.

बालगंधर्व पाडावे की नाही? हा भावनिक मुद्दा नाही हे पहिल्यांदा स्पष्ट केलं पाहिजे. हा अस्मिता वगैरेचाही मुद्दा नाही; तर समाजाच्या सांस्कृतिक अभिरुचीचा प्रश्न आहे. विचार करा की हे बालगंधर्व रंगमंदिर नसून ‘शिवाजी महाराज रंगमंदिर’ , डॉ. आंबेडकर रंगमंदिर, स्वा. सावरकर रंगमंदिर, म.फुले रंगमंदिर असतं तर? तर कोणत्या ना कोणत्या जाती-धर्माच्या लोकांनी रक्ताचे पाट वाहण्याची भाषा केली असती. पण हे स्मारक एका कलाकाराचे स्मारक आहे त्यामुळे त्याला पाडण्याचा प्रस्ताव कोणीही कधीही मांडू शकतो. काही दिवसांपूर्वी डॉ. होमी भाभा यांच्या बंगल्याचा असाच सहज लिलाव झाला होता. कोणी हू की चू केलं नव्हतं. कारण आम्हाला फक्त राजकीय, जातीय, धार्मिक अस्मिता आहेत, वैज्ञानिक किंवा कलाविषयक अस्मिता तयारच झालेल्या नाहीत. समाज म्हणजे जाती-धर्म-वंश-भाषा-प्रदेश यांच्या टोकाच्या अस्मिता हेच आम्हाला शिकवलं गेलं आहे. वैज्ञानिक किंवा कलाविषयक काही अभिरुची असू शकते, वैज्ञानिक-कलाकार यांच्याही आठवणी जपायच्या असतात हे आम्हाला शिकवलेलेच नाही. त्यातून कला हा तर आपल्याकडे ऐच्छिक विषय आहे.

आम्हाला त्या गाण्याबिण्यातलं काही कळत नाही बुवा हे अभिमानाने सांगणारे लोक आपल्याकडे आहेत. म्हणजे गाण्यातलं सगळ्यांनाच कळले पाहिजे असं अजिबात नाही. पण कळत नाही यात तरी अभिमान बाळगण्यासारखं काय आहे? मुद्दा असा आहे की कलाविषयक इतकी इदासिनता ज्या समाजात असते त्या समाजात कलाकारांची स्मारकं आवश्यकच असतात. अन्यथा समाज फक्त राजकारणाच्या अंगानं सुजत जाण्याचा आणि आपण त्यालाच बाळसं समजण्याचा धोका वाढत जातो. म्हणूनच अस्मितेचा किंवा भावनेचा विषय म्हणून नाही तर समाजाचं निरोगीपण टिकण्याच्या दृष्टीने बालगंधर्व नावाच्या गायकाचं हे पुलं नावाच्या एका साहित्यिकानं आखलेलं स्मारक अबाधित राहणं आवश्यक आहे.

शेक्सपिअरचं घर असो की वर्डस्वर्थचं स्मारक, ते बघायला पुणेकर गर्दी करतील पण आपल्याच भूमीतल्या एका कलाकाराचं स्मारक वाचवण्यासाठी पुढे येतील का? हा प्रश्नच आहे. तरीही यावर बोललं पाहिजे. मान्य की हा व्यावसायिकरणाचा म्हणजे वाढीव एफ.एस.आयचा जमाना आहे आणि सर्वच गोष्टींचं, वास्तूंचं व्यापारीकरण होत आहे. तरीही काही गोष्टी, काही वास्तू एफएसआयपेक्षा मोठ्या आहेत हे ठामपणे सांगावं लागतं. अन्यथा कारभाऱ्यांना मोकळीक दिली तर लालमहाल आणि शनिवारवाड्याच्या डोक्यावरही मॉल्स, मल्टीप्लेक्स दिसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Story img Loader