लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : बोपदेव घाटात तरुणीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या तीन आरोपींविरोधात आरोप निश्चितीचा मसुदा सरकार पक्षातर्फे ८ एप्रिल रोजी सादर केला जाणार आहे. या प्रकरणात तिसरा आरोपी अद्याप फरार असून, भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५६ नुसार, त्याच्या अनुपस्थितीत खटला चालविण्यात यावा, यासाठीही सरकार पक्षातर्फे अर्ज केला जाणार आहे.

पुण्यासह देशभरात खळबळ उडवून दिलेल्या बोपदेव घाट बलात्कार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून ॲड. उज्ज्वला पवार यांची नियुक्ती झाली आहे. राज्याच्या विधी आणि न्याय खात्याने अधिसूचना काढून हे प्रकरण तत्परतेने चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, ॲड. उज्ज्वला पवार यांनी गुरुवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयात अधिसूचना दाखल केली. आता पुढील सुनावणीला आरोप निश्चितीचा मसुदा सादर करत फरार आरोपीच्या अनुपस्थितीत त्याच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात खटला चालविण्यासाठी सरकार पक्ष प्रयत्नशील आहे.

बोपदेव घाटात मित्रासमवेत फिरायला गेलेल्या तरुणीला कोयत्याचा धाक दाखवून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना तीन ऑक्टोबर २०२४ च्या रात्री घडली. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार शोएब अख्तर उर्फ शोएब बाबू शेख (वय २७) आणि चंद्रकुमार रविप्रसाद कनोजिया (वय २०) यांना पोलिसांनी अटक केली आहे, तर तिसरा आरोपी बाप्या गोसावी उर्फ सूरज दशरथ गोसावी उर्फ सोमनाथ यादव हा अद्याप फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. या तिन्ही आरोपींविरोधात पाचशे पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.