लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी : शहरात गेल्या वर्षी पावसाळ्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे यंदा महापालिका प्रशासनाने नालेसफाईचे काम लवकर सुरुवात करण्याचे नियोजन केले आहे. गेल्या वर्षी २२ मार्चपासून नालेसफाई सुरू केली होती. यंदा २० फेब्रुवारीपासूनच नालेसफाईचे काम हाती घेण्याचा आदेश महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आठही क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दोन ते ११ मीटर रुंदीचे शंभर किलोमीटर अंतराचे १४४ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा व इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लॅस्टिक, भंगार व टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती कचरा या नाल्यांमध्ये टाकतात. या नाल्यात गाळ साचल्याने नाले अरुंद व उथळ होतात. परिणामी, पावसाळ्यात पाणी वाहून नेण्याची त्यांची क्षमता कमी होते. पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घर व दुकानांमध्ये शिरते. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आरोग्य विभागाकडून दर वर्षी सर्व नाले, पावसाळी पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या आणि गटार स्वच्छ केले जातात.

गेल्या वर्षी पावसाळ्यात चिखली, रुपीनगर, नवी सांगवी, जुनी सांगवी, पिंपरीतील भाटनगर, दापोडीसह आदी भागात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे नागरिकांचे स्थलांतर करण्याची वेळ महापालिकेवर आली होती. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या वतीने विशेष खबरदारी घेण्यास सुरुवात झाली आहे. आरोग्य, स्थापत्य विभाग व क्षेत्रीय कार्यालयांना २० फेब्रुवारीपासूनच नालेसफाईचे काम हाती घेण्याचा आदेश दिला आहे.

जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनच्या साहाय्याने नालेसफाई केली जाईल. ज्या ठिकाणी अरुंद नाले आहेत, तिथे मशिन जात नाही. अशा नाल्यांमध्ये सुरक्षेची सर्व साधने वापरून मनुष्यबळाद्वारे सफाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. नालेसफाईपूर्वी व नंतर छायाचित्रे घेतली जाणार असल्याचे आरोग्य विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drain cleaning in pimpri from february 20 municipal commissioner orders regional officers pune print news ggy 03 mrj