लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी : शहरातील आठही क्षेत्रीय कार्यालयांतर्गत लहान-मोठे असे १४४ नाले आहेत. या नाल्यांची पावसाळ्यापूर्वी यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्यात येत असून, ३१ मेच्या मुदतीत नालेसफाई पूर्ण झाली नाही. ९० टक्के नालेसफाई झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. मात्र, पावसाळापूर्व कामे संथ गतीने सुरू असून, मे महिना संपत आला, तरी अद्यापही नालेसफाई पूर्ण झाली नाही.

महापालिकेकडून दर वर्षी पावसाळा पूर्व कामांतर्गत शहरातील नाले, ओढे, पावसाळी गटारे, वाहिन्यांची स्वच्छता केली जाते. मात्र, ही कामे पावसाळा तोंडावर आला, तरी सुरूच असतात. हे चित्र अलीकडच्या काही वर्षांतील आहे. पिंपरी-चिंचवड शहरामध्ये २ ते ११ मीटर रुंदीचे शंभर किलोमीटर अंतराचे १४४ नैसर्गिक नाले आहेत. हे नाले शहरातील पवना, मुळा आणि इंद्रायणी या नद्यांना जाऊन मिळतात. सर्वच नाले उघडे असल्याने या नाल्यांमध्ये राडारोडा, प्लॅस्टिक, भंगार आणि टाकाऊ साहित्य टाकले जाते. अनेक नागरिक घरगुती कचरा या नाल्यांमध्ये टाकतात. गाळ साचल्याने नाले अरुंद आणि उथळ होतात. परिणामी, पावसाळ्यात नाल्यांची वहनक्षमता कमी होते.

आणखी वाचा-पिंपरी : प्रसूती झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान ‘वायसीएम’मध्ये मृत्यू… डॉक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचा नातेवाईकांचा आरोप

पावसाळ्याचे पाणी वाहून न गेल्याने ते साचून परिसरातील घर व दुकानांमध्ये शिरते. पावसाळ्यामध्ये शहरात पूरस्थिती निर्माण होऊ नये, म्हणून आयुक्त शेखर सिंह यांनी २२ मार्चला बैठक घेत ३१ मेपूर्वी नालेसफाई पूर्ण करण्याचा आदेश दिला होता. परंतु, मुदतीत नालेसफाई झाली नाही. शहर परिसरात मागील पंधरा दिवसांत चार ते पाच वेळा अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे नालेसफाईत काहीसा अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतरही ९० टक्के नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महापालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. यंदा पाऊस वेळेत पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नालेसफाई लवकर पूर्ण करण्याचे आव्हान आरोग्य विभागासमोर असणार आहे.

आठही क्षेत्रीय कार्यालयांमार्फत नालेसफाईचे काम सुरू असून, अंतिम टप्प्यात आले आहे. जेसीबी, पोकलेन व स्पायडर मशिनने नालेसफाई केली जात आहे. तसेच नालेसफाईपूर्वीचे व नंतरचे छायाचित्र घेतले जात असल्याचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drain cleaning of pimpri chinchwad municipal corporation incomplete how much drainage was done pune print news ggy 03 mrj
Show comments