लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सव दीड महिन्यांवर येऊन ठेपला आहे. आगामी गणेशोत्सवाचे नियोजन करण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तालयात पदाधिकाऱ्यांची बैठक बुधवारी आयोजित करण्यात आली. बैठकीत मानाची मंडळे आणि अन्य मंडळांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘मानापमान’ नाट्य रंगले. मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष मान दिल्याचा प्रकार निदर्शनास आल्यावर अन्य मंडळांचे पदाधिकारी नाराज झाले. ते बैठकीतून बाहेर पडल्याने पोलिसांना बैठक रद्द करावी लागली. गुरुवारी (१० ऑगस्ट) नवी पेठेतील दुर्वांकुर हॉलमध्ये पुन्हा बैठक होणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले.
पुणे पोलिसांनी आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. पोलीस आयुक्त रितेशकुमार, सहपोलीस आयुक्त डॉ. संदीप कर्णिक यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी बैठकीस उपस्थित होते. गणेश मंडळाचे कार्यकर्ते बैठकीत आले. मात्र, बैठकीपूर्वी शहरातील मानाच्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बोलाविण्यात आल्याचे अन्य मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांकडे नाराजी व्यक्त केली. मंडळाचे कार्यकर्ते बैठकीतून बाहेर पडले. या बैठकीसाठी हुतात्मा बाबू गेनू मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब मारणे, साखळीपीर मंडळाचे अध्यक्ष रवींद्र माळवदकर, हत्ती गणपती मंडळाचे अध्यक्ष श्याम मानकर, खडकमाळ आळी मंडळाचे अध्यक्ष संजय बालगुडे, तसेच अन्य मंडळांचे पदाधिकारी बैठकीसाठी आले होते.
आणखी वाचा-पुणे: कुरुलकरच्या मोबाइलबाबत ‘एटीएस’ने दिलेल्या माहितीत विसंगती?
बैठकीचा निरोप देण्याबाबत काही गल्लत झाली असून, कोणालाही दुजे लेखण्याचा अजिबात उद्देश नाही, असे सहपोलीस आयुक्त डॉ. कर्णिक यांनी सांगितले. गैरसमजातून घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी दिलगिरी व्यक्त केली.