ज्येष्ठ नाटककार विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या नाटकाची संगीत रंगभूमीवर नाममुद्रा
पुणे : साठोत्तरी आधुनिक संगीत रंगभूमीवर दिमाखदार पदार्पण केलेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘सुवर्णतुला’ या नाटकांना ६० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्येष्ठ नाटककार आणि ‘लोकसत्ता’चे माजी संपादक विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या या नाटकांनी संगीत रंगभूमीवर आपली नाममुद्रा प्रस्थापित केली.
‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग ९ ऑक्टोबर १९६० रोजी रंगभूमीवर सादर झाला होता. तर, दुसऱ्याच दिवशी म्हणजे १० ऑक्टोबर रोजी ‘सुवर्णतुला’ अवतरले होते. या दोन्ही नाटकांना ६० वर्षे पूर्ण होत आहेत. उर्दू आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व असलेल्या विद्याधर गोखले यांनी महान संस्कृत कवी पंडित जगन्नाथ यांच्या जीवनावर आधारित ‘पंडितराज जगन्नाथ’ या नाटकासाठी उर्दू शेरोशायरी आणि संस्कृत संवादलेखन केले होते. भालचंद्र पेंढारकर, मंगला संझगिरी, मामा पेंडसे, मा. दत्ताराम, चित्तरंजन कोल्हटकर, शंकर घाणेकर, ललिता केंकरे, चंद्रकांत गोखले, प्रसाद सावकार अशा दिग्गज कलाकारांचा अभिनय हे या नाटकाचे वैशिष्टय़ ठरले. ज्येष्ठ संगीतकार वसंत देसाई यांच्या संगीताने नटलेल्या ‘जय गंगे भागीरथी’ या नाटय़पदाने लोकप्रियतेचा कळस गाठला होता. दिल्लीमध्ये झालेल्या या नाटकाच्या प्रयोगासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आले होते.
नटवर्य गोपीनाथ सावकार यांच्या ‘कलामंदिर’ संस्थेतर्फे ‘सुवर्णतुला’ या नाटकाचा पहिला प्रयोग १० ऑक्टोबर १९६० रोजी झाला होता. श्रीधर कवी यांच्या ‘हरिविजय’ गं्रथातून श्रीकृष्ण चरित्रातील प्रसंगावर गोखले यांनी हे नाटक लिहिले होते. स्वरराज छोटा गंधर्व आणि पं. राम मराठे यांचे संगीत आणि त्यांच्यासह प्रसाद सावकार, कान्होपात्रा, गोपीनाथ सावकार यांनी भूमिका साकारल्या होत्या.
नटसम्राट बालगंधर्व यांच्या पश्चात संगीत रंगभूमी पुढे सुरू कशी राहणार? अस प्रश्न उपस्थित झाला. लेखकांनी चांगली नाटके लिहिली पाहिजेत, चांगल्या कलावंतांनी ती सादर केली पाहिजेत तरच ती रसिकांना आवडतात हे त्याचे उत्तर होते. त्या उद्देशातून विद्याधर गोखले यांनी लिहिलेल्या ‘पंडितराज जगन्नाथ’ आणि ‘सुवर्णतुला’ या दोन्ही नाटकांनी संगीत नाटक म्हणून फार मोठे स्थान रसिकांमध्ये प्राप्त केले. संगीत रंगभूमी पुढे सुरू राहण्यामध्ये या दोन नाटकांचे मोठे योगदान आहे. संगीत रंगभूमीचे महत्त्व टिकवून ठेवण्यामध्ये किंबहुना वर्धिष्णू करण्यामध्ये गोखले यांच्या या दोन नाटकांचा नक्कीच समावेश करावा लागेल.
– सुरेश साखवळकर, संगीत रंगभूमीचे ज्येष्ठ अभ्यासक