बिबवेवाडीत स्वामी विवेकानंद पुतळ्याजवळ बांधण्यात आलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाटय़गृहाचे उद्घाटन शनिवारी (८ फेब्रुवारी) केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या हस्ते होणार असल्याचे महापौरांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकार परिषदेत जाहीर केले. मात्र, या घोषणेनंतर दोनच तासांनी हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यान, या उद्घाटनाला राजकीय रंग आला असून नाटय़गृहाचे उद्घाटन महायुतीतर्फे शुक्रवारी सकाळी केले जाणार असल्याचे गुरुवारी जाहीर करण्यात आले.
या नाटय़गृहाच्या उद्घाटनाची घोषणा महापौर आणि सभागृहनेता सुभाष जगताप यांनी गुरुवारी सायंकाळी केली. मात्र, हा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आल्याचे नंतर जाहीर करण्यात आले. आठ दिवसांनंतर हा कार्यक्रम घेतला जाईल, असे जगताप यांनी सांगितले. एकतीस कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या नाटय़गृहामुळे दक्षिण पुण्यातील रहिवाशांना नाटकांचा आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद मिळणार आहे.
महायुतीचे आरोप राष्ट्रवादीने फेटाळले
नाटय़गृहाचे उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्याच्या निर्णयाला आव्हान देत महायुतीतर्फे नाटय़गृह उद्घाटनाचा कार्यक्रम शुक्रवारी (८ फेब्रुवारी) सकाळी आयोजित करण्यात आला आहे. आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, शिवेसनेचे शहरप्रमुख श्याम देशपांडे, आरपीआयचे परशुराम वाडेकर यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या संदर्भात महापालिकेत झालेल्या ठरावात खाडाखोड करण्यात आल्याचा आरोपही या नेत्यांनी केला. मात्र, या दाव्यात काहीही तथ्य नाही. हे फक्त राजकारण आहे. शरद पवार आणि गोपीनाथ मुंडे यांना उद्घाटनासाठी बोलावण्याचा ठराव गटनेत्यांच्या बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्या बैठकीत भाजप आणि शिवसेनेचे गटनेते उपस्थित होते. त्यानंतर मुख्य सभेतही पवार यांच्या हस्ते व मुंडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन करण्याचा ठराव बहुमताने मंजूर झाला होता, असे सभागृहनेता सुभाष जगताप यांनी सांगितले. महापालिकेत मंजूर झालेल्या ठरावांनुसारच हा कार्यक्रम होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नक्की काय घडले..?

  • – नाटय़गृहाचे काम पूर्ण, खर्च एकतीस कोटी
  • शरद पवार यांच्या हस्ते उद्घाटन निश्चित
  • गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम
  • – महायुतीतर्फे आदल्या दिवशीच उद्घाटनाची घोषणा
  • – वाद टाळण्यासाठी कार्यक्रमच रद्द करण्याचा राष्ट्रवादीचा निर्णय