सांस्कृतिक कार्यक्रमांचे माहेरघर असलेल्या नाटय़प्रेमी पुणेकरांना महापालिकेकडून नव्या वर्षांत दोन नाटय़गृहांची भेट मिळणार आहे. कोथरूडमध्ये छोटेखानी नाटय़गृहाचा समावेश असलेले बाळासाहेब ठाकरे कलामंदिर आणि येरवडा येथील अण्णा भाऊ साठे नाटय़गृह ही दोन नाटय़गृहे शहराच्या वैभवात भर घालण्यासाठी सज्ज होत आहेत.
कोथरूडमध्ये ३८४ आसनक्षमता असलेले छोटेखानी नाटय़गृह आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे कायमस्वरूपी दालन असे स्वरूप असलेल्या बाळासाहेब ठाकरे कलामंदिराचे काम गतीने सुरू आहे. नव्या वर्षांत हे कलामंदिर रसिकांसाठी खुले होणार आहे. शेजारीच ८९३ आसनक्षमतेचे यशवंतराव चव्हाण नाटय़गृह असल्याने एकाच प्रांगणात दोन नाटय़मंदिरे असा अभिनव प्रयोग राज्यामध्ये पुण्यातच घडणार आहे. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाच्या आवारात तीन हजार चौरस फुटांचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यापैकी दीड हजार चौरस फूट जागेमध्ये छोटेखानी नाटय़गृह उभारण्यात येणार आहे. त्यासाठी २० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. छोटेखानी नाटय़गृहासह पहिल्या मजल्यावर बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे, दुर्मीळ छायाचित्रे, त्यांच्या भाषणांच्या सीडी असे स्वरूप असलेले कायमस्वरूपी दालन असेल. ग्रीन रूम, बुकिंग ऑफिस, मेकअप रूम, रंगीत तालमीसाठी सभागृह, उपाहारगृह, स्वच्छतागृह असे या वास्तूमध्ये असेल. कलामंदिराचे विद्युत, वातानुकूलन यंत्रणा, नाटय़गृहातील खुच्र्या आणि अंतर्गत सजावट ही कामे पूर्ण होण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. नगरसेवक पृथ्वीराज सुतार यांनी या कलामंदिरासाठी पाठपुरावा केला आहे, अशी माहिती महापालिकेचे रंगमंदिर प्रमुख प्रकाश अमराळे यांनी दिली.
येरवडा येथील गुंजन चित्रपटगृह परिसरात सुमारे ७०० आसनक्षमता असलेल्या अण्णा भाऊ साठे नाटय़गृहाची उभारणी पूर्ण झाली आहे. मात्र, तेथे नाटकाचे नेपथ्याचे सामान नेण्यासाठी लिफ्ट उभारणी झालेली नाही. त्याखेरीज नाटय़गृहासाठी आवश्यक त्या सोयी-सुविधा आणि कार्यालयीन कामकाजासाठी योग्य दुरुस्ती या गोष्टी अद्याप होण्याचे बाकी आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर या बाबींची पूर्तता केली जाईल आणि सहा महिन्यांत अण्णा भाऊ साठे नाटय़गृह पुणेकरांच्या सेवेत रुजू होऊ शकेल, असेही अमराळे यांनी सांगितले.
दोन नाटय़गृहांची भर
महापालिकेतर्फे सध्या बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाटय़गृह (कोथरूड), गणेश कला क्रीडा मंच, अण्णा भाऊ साठे नाटय़गृह (पद्मावती), डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन (मंगळवार पेठ), महात्मा फुले सभागृह (वानवडी), सावित्रीबाई फुले सभागृह (भवानी पेठ), भारतरत्न पं. भीमसेन जोशी नाटय़गृह (औंध), पं. जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन (घोले रस्ता), पं. भीमसेन जोशी कलादालन (सहकारनगर) राजीव गांधी ई-लर्निग स्कूलचे विजय तेंडुलकर नाटय़गृह (सहकारनगर), व्यंगचित्रकार बाळासाहेब ठाकरे कलादालन (सारसबाग) आणि मौलाना अबुल कलाम आझाद स्मारक (कोरेगाव पार्क) या १३ वास्तूंची देखभाल केली जात आहे. त्यामध्ये आता दोन नाटय़गृहांची भर पडणार आहे.
ही आहेत वैशिष्टय़े
- कोथरूडमध्ये ३८४ आसनक्षमतेचे छोटेखानी नाटय़गृह
- कोथरूडमध्ये एकाच परिसरात दोन नाटय़गृहे
- गुंजन चित्रपटगृह परिसरात ७०० आसनक्षमतेचे नाटय़गृह