बहुभाषिक नाटके पाहण्याची संधी हे वैशिष्टय़ असलेल्या विनोद दोशी नाटय़महोत्सवात यंदा ज्येष्ठ अभिनेते नसिरुद्दीन शाह यांचा नाटय़प्रयोग रसिकांना अनुभवता येणार आहे. तर, या महोत्सवामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी आणि राजस्थानी अशा भाषांतून सादर होणाऱ्या पाचपैकी ‘लाइव्ह म्युझिक’चा वापर असलेली चार नाटके हेही एक आगळेपण आहे.
विनोद आणि सरयू दोशी फाउंडेशनतर्फे २३ ते २७ फेब्रुवारी या कालावधीत बालगंधर्व रंगमंदिर येथे यंदाचा विनोद दोशी नाटय़महोत्सव होणार आहे. महोत्सवातील पहिले चार दिवस दररोज सायंकाळी साडेसात वाजता नाटय़प्रयोग होणार असून नसिरुद्दीन शाह, रत्ना पाठक-शाह आणि हीबा शाह यांचा सहभाग असलेल्या ‘इस्मत आपा के नाम’ या नाटकाचा प्रयोग रात्री साडेनऊ वाजता होणार आहे. फाउंडेशनच्या विश्वस्त सरयू दोशी आणि अशोक कुलकर्णी यांनी मंगळवारी ही माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, मोहित टाकळकर, इरावती कर्णिक आणि किरण यज्ञोपवीत या वेळी उपस्थित होते.
विल्यम शेक्सपिअरच्या ‘अ मिडसमर नाइट्स ड्रीम’वर आधारित जयपूर येथील उजागर ड्रॅमॅटिक असोसिएशन संस्थेतर्फे ‘कसुमल सपनो’ या हिंदूी आणि राजस्थानी भाषेतील नाटय़प्रयोगाने २३ फेब्रुवारी रोजी महोत्सवाचा प्रारंभ होणार आहे. अजितसिंग पालावल यांनी दिग्दर्शित केलेल्या या नाटकाला अभिनेते रघुवीर यादव यांनी संगीत दिले आहे. मनोरंजन क्षेत्रातील स्त्री असण्याच्या अनुभवाचं मार्मिक, उपहासात्मक आणि रंजक दर्शन घडविणारे जर्मन दिग्दर्शिका सोफिया स्टेफ यांचे ‘सी शार्प सी ब्लंट’ हे नाटक दुसऱ्या दिवशी होणार आहे. एम. डी. पल्लवी यांचा एकल अभिनय हे या नाटकाचे वैशिष्टय़ आहे. प्रतीकात्मकता आणि उपरोधिक शैलीतून चंदनचोरी हा विषय उलगडणाऱ्या ‘अपराधी सुगंध’ नाटकाचा प्रयोग २५ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महाराष्ट्र कल्चरल सेंटरची निर्मिती असलेल्या या नाटकाचे किरण यज्ञोपवीत यांनी लेखन आणि दिग्दर्शन केले आहे.
आनंद यांच्या ‘व्यासं विघ्नेश्वरं’ या मल्याळम कादंबरीसह हार्हे लुईस बोर्हेस यांच्या ‘ब्लाइंडनेस’ या निबंधावरून प्रेरित अभिषेक मजुमदार दिग्दर्शित ‘कौमुदी’ हे नाटक महोत्सवातील चौथ्या दिवशी होणार आहे. क्रांतिकारी उर्दू लेखिका इस्मत चुगताई यांना समर्पित मोटली थिएटर ग्रुपने सादर केलेल्या नसिरुद्दीन शाह दिग्दर्शित ‘इस्मत आपा के नाम’ नाटकाने २७ फेब्रुवारी रोजी महोत्सवाचा समारोप होणार आहे. ‘छुई मुई’, ‘घरवाली’ आणि ‘मुघल बच्चा’ या तीन हृदयस्पर्शी कथांचे एकल नाटय़मय सादरीकरण हे नाटकाचे वैशिष्टय़ आहे.
मराठी नाटकाची कोंडी फोडली
नाटक ही महाराष्ट्राची ओळख आहे. अनेक वर्षे मराठी नाटक हे मराठीतच अडकून पडले होते. ही कोंडी फोडण्याचे काम विनोद दोशी नाटय़महोत्सवाने केले, असल्याचे डॉ. मोहन आगाशे यांनी सांगितले. या महोत्सवाच्या माध्यमातून मराठी माणसांना बाहेरच्या नाटकांची ओळख करून देण्याबरोबरच मराठी नाटकांचा बाहेरच्या रंगभूमीशी परिचय करून दिला जात आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

Story img Loader