जे. जे. कला महाविद्यालयात असताना मला काय गवसलं. प्रत्येक सरांची चेष्टा करणं हाच माझा बेसिक गुणधर्म. नकला लयबद्ध पद्धतीने मांडल्या आणि त्याचं नाटक झालं. अभिनेता होण्यापूर्वीच्या चित्रकलेच्या प्रांतातील मुशाफिरीची सफर घडवित नाना पाटेकर याने शब्द ‘चित्रा’ची अनोखी मैफल रंगविली. जेव्हा भाषा अस्तित्वात नव्हती, तेव्हा चित्र हीच मूळ संवादाची भाषा होती आणि घरामध्ये फारसा न बोलणाऱ्या मला चित्र ही जवळची भाषा वाटली, असेही नानाने सांगितले.
‘विवेक’ आणि ‘टिळक स्मारक मंदिर ट्रस्ट’तर्फे ‘दृश्यकला’ कोशाचे प्रकाशन शनिवारी नाना पाटेकर याच्या हस्ते झाले. ‘लोकमत’चे मुख्य संपादक विजय कुवळेकर, ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, कोशाचे प्रबंध संपादक दिलीप करंबळेकर, खंड संपादक सुहास बहुळकर आणि दीपक घारे या प्रसंगी उपस्थित होते.
मुरुडला सतत समोर समुद्र. त्यामुळे कुठलीही गोष्ट छोटय़ा कॅनव्हासमध्ये दिसलीच नाही. वांड असलो तरी घरामध्ये फारसा बोलायचो नाही. चौथीत असताना नाटकामध्ये मी केलेले काम पाहण्यासाठी आलेल्या वडिलांनी माझे कौतुक केले. तोच माझ्या बालपणातील आनंदाचा क्षण. पुढे हे वेड वाढलं तरी चित्रकला सुटली नाही या आठवणींना नानाने उजाळा दिला. लेक्चर देतानाही आपल्यामध्येच मग्न असणारे गुर्जरसर, चांदीची पेटी आणि त्यामध्ये असलेल्या पानाचा तोंडात भरलेला तोबरा ठेवून शिकविणारे आंबेरकरसर, शिकवणं आवडलं नाही तरी चॉकलेट देणारे मनोहर जोशीसर यांची माहिती देत नाना म्हणाला, कॅलिग्राफी हा खरं तर माझा विषय. पण, रांगोळी काढावी तशी अच्युत पालव याने अक्षराला चेहरा दिला. वासुदेव कामतची चित्रं पाहताना वेडं लागतं.
आबालाल रेहमान, एम. आर. आचरेकर, के. बी कुलकर्णी यांची चित्र माझ्या वेगळ्या आयुष्यात प्रतिबिंबित झाली. ही कलाकार मंडळी नाव, पैसा यासाठी कधीच नव्हती. त्यामुळे चित्र, नाटक,. कविता यातून ऊर्मी बाहेर आली की ती पुन्हा शांत. त्यामुळे ही माणसं गुलदस्त्यातचं राहिली. त्यांची या कोशामुळे भेट झाल्याचा आनंद नानाने व्यक्त केला. मी चित्रकार आहे तर कुंचल्यानंच बोलेन असे चालत नाही. कुंचल्याचा चाकू कधी होईल हे सांगता येत नाही, अशी टिप्पणीही त्याने केली.
टाळी म्हणजे दाद, ती भीक नव्हे
टाळ्या उत्स्फूर्तच आल्या पाहिजेत. ती दाद आहे. टाळीसाठी भीक कसली मागता. काही वेळा टाळी वाजत नाही याचाच आनंद मोठा असतो. बेगम अख्तर यांच्या मैफलीनंतर एकही टाळी न वाजल्याचे तबलजीने निदर्शनास आणले. तेव्हा ‘इस सन्नाटे के लिये तो हम जीते है।’, अशी टिप्पणी बेगम अख्तर यांनी केल्याचे नाना पाटेकर याने सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा