पुणे : ‘हनी ट्रॅप’ प्रकरणात अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी सोमवारी दिले. त्यानुसार विशेष न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांना १२ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
विशेष न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार डाॅ. कुरुलकर यांची येरवडा कारागृहातील विशेष कक्षात रवानगी करण्यात आली आहे. सोमवारी (२९ मे) कुरुलकर यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत संपली. कुरुलकर यांना विशेष न्यायालयात प्रत्यक्षात हजर केले करण्यात आले नाही. त्यांच्या न्यायालयीन कोठडीत चौदा दिवस वाढ करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले.
हेही वाचा >>> पिंपरी- चिंचवडशहरातील काही भागात गारपीट; वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी
डाॅ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील (पीआयओ) हेरांना संवेदनशील माहिती तसेच छायाचित्रे इ-मेलद्वारे पाठविल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. गेल्या वर्षी डॉ. कुरुलकर यांनी सहा देशांना भेटी दिल्या होत्या. शासकीय पारपत्राचा वापर करुन ते परदेशात गेले होते. परदेशात पाकिस्तानी हेरांना भेटल्याचा संशय राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) व्यक्त केला आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने डाॅ. कुरुलकर यांना मधू मोहजालात (हनी ट्रॅप) अडकवून त्यांच्याकडून संवेदनशील माहिती मिळवल्याचा संशय असून त्यांची पाॅलिग्राफ चाचणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा >>> विशेष रेल्वेने महाराष्ट्राला गुजरात, राजस्थानशी जोडणार
मात्र, पाॅलिग्राफ चाचणीबाबत अद्याप एटीएसने कोणताही अर्ज अद्याप न्यायालयात अर्ज दाखल केला नाही. कुरुलकर यांना पाकिस्तानातून काही इ-मेल पाठविण्यात आले आहे. त्यांनी इ-मेलला प्रतिसाद दिला आहे. त्यांनी पाकिस्तानातील आयपी ॲड्रेसवर मेल केल्याची माहिती गुगलने दिलेल्या अहवालातून उघड झाली आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅपटाॅप आणि मोबाइल संचाचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले असून याबाबतचा अहवाल एटीएसला मिळाला आहे.