पुणे : डीआरडीओचे संचालक, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी दाेन महिलांवर अत्याचार केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयात दाखल केलेल्या दोषाराेपपत्रात माहिती देण्यात आली आहे.
राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) कुरुलकर यांच्याविरुद्ध विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात एक हजार ८३७ पानांचे दोषारोपपत्र नुकतेच दाखल केले. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिच्याशी समाजमाध्यमात केलेल्या संवादाची प्रत राज्य दहशतवाद विरोधी पथकाने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात जोडली आहे. या संवादातून कुरुलकर यांनी झाराबरोबर अग्नि, ब्रह्मोस, रुस्तम या क्षेपणास्त्रांविषयी चर्चा केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
हेही वाचा >>> छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी; कोल्हापूरमधील तरुण ताब्यात
कुरुलकर यांनी दोन महिलांना डीआरडीओतील कामे मिळवून देण्याच्या आमिषाने दाेन महिलांवर अत्याचार केल्याचे दोषारोपपत्रात म्हटले आहे. कुरुलकर यांना अटक करण्यात आल्यानंतर तपासात अनेक बाबी उजेडात आल्या हाेत्या. एटीएसच्या पथकाने दोन महिलांची चौकशी केली होती. कुरुलकर यांनी दोन महिलांना डीआरडीओच्या विश्रामकक्षात बोलावले होते. महिलांचे जबाब एटीएसच्या पथकाने नोंदवून घेतले होते. एटीएसने न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात कुरुलकर यांनी दोन महिलांचे शोषण केल्याचा आरोप ठेवला आहे.