राहुल खळदकर, लोकसत्ता
पुणे : पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोपावरून दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केलेले संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) संचालक आणि वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकर पाकिस्तानी हेरांना परदेशात भेटल्याची माहिती ‘एटीएस’ला मिळाली आहे. त्यामुळे कुरुलकर यांना पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने मोहजालात (हनी ट्रॅप) अडकविल्यानंतर त्यांच्या परदेशात भेटी कशा आणि केव्हा झाल्या, याचा तपास सुरू करण्यात आला आहे.
कुरुलकर यांनी कार्यालयीन गोपनीय माहिती इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करून ‘पाकिस्तानी इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह’ (पीआयओ) गुप्तचर यंत्रणेला दिल्याचे तपासात आढळले आहे. त्यांनी शासकीय गोपनीय माहिती आर्थिक लाभासाठी पाकिस्तानला दिल्याचाही संशय आहे. ते पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेच्या हेरांशी संपर्क साधताना कोणत्या उपकरणांचा वा माध्यमांचा वापर करत होते, या दृष्टीने तपास करण्यात येत आहे. तसेच ते परदेशात गेल्यावर पाकिस्तानी हेरांना भेटल्याची माहिती मिळाली आहे. त्या अनुषंगानेही तपास करण्यात येत असल्याचे ‘एटीएस’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
कुरुलकर पाकिस्तानातील गुप्तचर यंत्रणेच्या हस्तकांच्या संपर्कात होते. त्यासाठी ते समाजमाध्यमातील संपर्क सुविधेचा वापर करत असल्याची माहिती ‘एटीएस’च्या पुणे पथकाला मिळाली होती. त्यानंतर ‘एटीएस’च्या पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. तपासात मिळालेल्या माहितीनुसार, शासकीय गोपनीय माहिती शत्रूराष्ट्राला पुरविल्याच्या आरोपावरून कुरुलकर यांना अटक करण्यात आली.
९ मेपर्यंत पोलीस कोठडी
कुरुलकर यांच्याविरुद्ध शासकीय गुपिते अधिनियम १९२३ च्या कलमांन्वये दहशतवादविरोधी पथकाच्या मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवी दिल्लीतील एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने तक्रार दिली आहे. कुरुलकर यांना न्यायालयाने ९ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
परराज्यांतील काही जणांच्या संपर्कात
प्रदीप कुरुलकर देशाच्या अन्य राज्यांतील काही जणांच्या संपर्कात होते. त्या दृष्टीने सखोल तपास करण्यात येणार असल्याचे ‘एटीएस’ने न्यायालयाला सांगितले. त्यांच्याकडून एक लॅपटॉप, चार्जर, मोबाइल संच आदी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत.
बंदी असतानाही स्मार्ट फोनचा वापर
कुरुलकर स्मार्ट फोनचा वापर करीत होते. या पदावरील अधिकाऱ्यांना स्मार्ट फोनचा वापर करण्यास मनाई असतानाही ते त्याचा वापर कसा करीत होते, याबाबत तपास करण्यात येत आहे. पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेने तरुणींच्या माध्यमातून वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांना मोहजालात अडकवल्याच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे लष्कराने वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जवानांनाही समाजमाध्यमे वापरण्यास मनाई केली आहे.