लोकसत्ता प्रतिनिधी
पिंपरी : अष्टविनायक गणपतींपैकी मोरगावचा मोरेश्वर, थेऊरचा चिंतामणी, सिद्धटेकचा सिद्धिविनायक यांसह चिंचवडगावातील मोरया गोसावी संजीवन मंदिर आणि खार नारंगी मंदिरातील दर्शनासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने पोशाखाची नियमावली प्रसिद्ध केली असून भक्तांकडून अभिप्राय मागविण्यात आले आहेत. आठवड्याभरात या वस्त्रसंहितेची अंमलबजावणी होणार आहे.
याबाबत चिंचवड देवस्थानअंतर्गत मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, नारंगी आणि चिंचवड ही पाच देवस्थाने येतात. या पाचही मंदिरात प्रवेश करण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार असल्याचे देवस्थानकडून सांगण्यात आले.
श्रद्धा आणि भक्तिभावाने महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर, श्री मंगलमूर्ती वाडा येथे भाविक दर्शनाला येतात. महासाधू श्री मोरया गोसावी महाराज यांचे संजीवन समाधी मंदिर, श्री मंगलमूर्ती वाडा या केवळ वास्तू नसून, ते श्रद्धा, संस्कृती आणि भक्तीचा केंद्रबिंदू आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक भक्ताने मंदिराच्या पवित्रतेचा आदर राखावा आणि भक्तीपर वातावरण टिकवण्यासाठी सहकार्य करावे. वर्तन मंदिराच्या शुद्धतेला अनुसरून असावे, यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे. मंदिराच्या पवित्रतेचा सन्मान राखण्यासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. श्रींच्या मंदिरात येणाऱ्या सर्व भाविकांनी मंदिरात प्रवेशासाठी योग्य पोशाख परिधान करावा, अशी विनंती चिंचवड देवस्थान ट्रस्टने दिलेल्या प्रसिद्धिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मंदिर प्रवेशासाठी वस्त्रसंहिता
- पुरुषांनी पारंपरिक आणि सभ्य पोशाख परिधान करावा. त्यात शर्ट, टी-शर्ट आणि पूर्ण पँट किंवा धोतर, कुर्ता पायजमा असा मंदिराच्या पवित्रतेला साजेसा पोशाख परिधान करावा.
- महिलांनी साडी, सलवार कमीज, पंजाबी ड्रेस किंवा अन्य पारंपरिक पोशाख परिधान करावा.
- मंदिराच्या पावित्र्यास अनुकूल असलेले आणि आदरयुक्त वस्त्र परिधान करावे.
- अतिआधुनिक, अपारंपरिक, पारदर्शक, स्लीव्हलेस, फाटके, शरीरप्रदर्शन करणारे कपडे मंदिर प्रांगणात परिधान करू नये.
चिंचवड देवस्थान ट्रस्ट अंतर्गत येणाऱ्या मोरगाव, थेऊर, सिद्धटेक, नारंगी आणि चिंचवड येथील मंदिरात प्रवेशासाठी वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे. भाविकांकडून अभिप्राय मागविले आहेत. अभिप्राय आल्यानंतर विश्वस्त मंडळाची बैठक होणार आहे. त्यात ठराव करून आठवड्याभरात अंमलबजावणी सुरू केली जाणार आहे. -मंदार महाराज देव,मुख्य विश्वस्त, चिंचवड देवस्थान ट्रस्ट