शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची पिंपरी पालिकेची घोषणा कागदावरच राहिल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या आठवडय़ापासून दापोडीत पाण्याचा ठणठणाट आहे. वारंवार तक्रार करूनही पाणीपुरवठा विभागाकडून लक्ष दिले जात नसल्याने रहिवासी संतापले आहेत. मुबलक पाणी उपलब्ध असतानाही फक्त दापोडीत भेडसावणारी पाणीटंचाई ‘कृत्रिम’ असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होतो आहे.
ऐन उन्हाळ्यात दापोडीतील पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण झाले आहेत. दापोडी व पाणीपुरवठय़ाविषयी तक्रारी हे समीकरण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने दिसून येते. यापूर्वी अपुरा व अवेळी होणारा पाणीपुरवठा ही समस्या होती. मधल्या काळात त्यात काही प्रमाणात सुधारणा झाली होती. मात्र, पुन्हा एकदा पाण्याविषयी ओरड सुरू झाली आहे. गेल्या आठवडय़ापासून दापोडीत पाण्याची समस्या गंभीर आहे. उन्हाळ्यात पाण्याचा वापर वाढला असताना नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नसल्याने नागरिक संतापले आहेत. याविषयी सातत्याने तक्रारी करूनही पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत, अशी लोकप्रतिनिधींची तक्रार आहे. ही टंचाई कृत्रिम असल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त होतो आहे. तशा तक्रारी आयुक्त राजीव जाधव यांच्याकडेही झाल्या आहेत. यासंदर्भात, कार्यकारी अभियंता शरद जाधव यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drinking water dapodi problem supply