पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावरील भैरोबानाला चैाकात मोटारीने दुचाकीस्वार तरुणाला धडक दिली. दुचाकीस्वार तरुणाने मोटारीचे छायाचित्र मोबाइलवर काढल्यानंतर मुजोर मोटारचालकाने त्याच्या अंगावर मोटार घातली. तरुणाला एक किलोमीटर फरफटत नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोटारचालकाला अटक केली.
राजीव कृष्णकुमार बर्मन (वय ६०, रा. सेक्रेड हार्ट टाऊन सोसायटी, वानवडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अभिजित येडुबा गोलाइत (वय ३०, रा. हेवन पार्क सोसायटी, अवधूत रेसीडन्सी, आझादनगर, महंमदवाडी रस्ता, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-सोलापूर रस्त्यावरुन दुचाकीस्वार गोलाइत शनिवारी रात्री नऊच्या सुमारास निघाले होते. भैराेबानाला चौकात मोटारीने पाठीमागून दुचाकीस्वार गोलाइत यांना धडक दिली. गोलाइत यांनी दुचाकी रस्त्यच्या कडेला लावली आणि मोबाइलमधील कॅमेऱ्याने छायाचित्र काढले. मोबाइलवर छायाचित्र काढणाऱ्या गोलाइत यांच्या अंगावर मोटारचालक बर्मन यांनी मोटार घातली. प्रसंगावधान राखून गोलाइत मोटारीच्या बोनेटवर चढले. त्यानंतर बर्मन यांनी मोटार तशीच पुढे नेली. भैरोबानाला चौक ते ९३ ॲव्हेन्यू माॅल चौकापर्यंत गोलाइत यांना फरफटत नेले. या घटनेत गोलाइत यांना दुखापत झाली.
९३ ॲव्हेन्यू माॅल चौकातील सिग्नलला बर्मन यांनी मोटार थांबविली. साधारणणे एक ते दीड किलोमीटर अंतरापर्यंत गोलाइत यांना फरफटत नेले. गोलाइत यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. चौकात जमलेल्या नागरिकांनी बर्मन यांना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. गोलाइत यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकणी बर्मन यांना अटक करण्यात आली. सहायक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सत्यजित आदमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करत आहेत.
मोटारीच्या धडकेत ज्येष्ठ महिला जखमी वारजे भागात मोटारीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी मोटारचालक महिलेविरुद्ध वारजे माळवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मीनाक्षी जयवंत मारणे (वय ६२, रा. स्नेहा काॅम्प्लेक्स, वारजे माळवाडी) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी एका मोटारचालक महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत मारणे यांनी फिर्याद दिली आहे. मारणे शनिवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास वारजे भागातून निघाल्या होत्या. सौंदर्या हाॅटेलजवळ रस्ता ओलांडून पदपथावर जात असताना मोटारीने मारणे यांना धडक दिली. अपघातात मारणे जखमी झाल्या. पोलीस हवालदार डी. डी. देशमुख तपास करत आहेत.