पुणे : कोथरुड भागातून अटक केलेल्या संशयित दहशतवाद्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिरादार यांनी २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकिट, इलेक्ट्राॅनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
हेही वाचा >>> राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्षपदी अजित गव्हाणे
मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय २४), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय २३, दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय ३१) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेले इम्रान खान, युनूस साकी यांना कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी न्यायालयात हजर केले. बनावट आधारकार्ड तयार करणे, शस्त्र बाळगणे यासह विविध कलमांन्वये दोघांविरुद्ध कोथरुड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून बनावट आधारकार्ड, ड्रोनचे साहित्य, काडतूस, पांढऱ्या रंगाच्या गोळ्या, पिस्तूल ठेवण्याचे चामडी पाकिट, इलेक्ट्राॅनिक वजन काटा असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने त्यांना पोलीस कोठडी देण्याची विनंती सहायक सरकारी वकील ॲड. रेणुका देशपांडे यांनी युक्तीवादात केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ए. सी. बिरादार यांनी दोघांना २५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.