पुणे : अमली पदार्थ विक्री प्रकरणात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने एका तरुणाला अटक केली. कात्रज भागातील मांगडेवाडी परिसरात ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून चरस, मोबाइल संच, रोकड असा एक लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
शिवलिंग नागनाथ आवटे (वय ३९, रा. शंभू रेसीडन्सी, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून ९८ ग्रॅम चरस, दोन मोबाइल संच, रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाईचे आदेश दिले आहेत. आवटे पुणे-सातारा रस्त्यावरील मांगडेवाडीत अमली पदार्थ विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून त्याला पकडले. त्याची झडती घेण्यात आली. तेव्हा त्याच्याकडे चरस सापडले. आवटेने चरस कोठून आणले, तसेच कोणाला विक्री करणार होता ? यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.
अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त गणेस इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक निरीक्षक अनिकेत पोटे आदी पोलिसांनी ही कारवाई केली.