पुणे : अमली पदार्थमुक्त युवा पिढीसाठी कोथरूडमध्ये विविध संघटनांच्या वतीने निदर्शने करण्यात आली. त्यामध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवित कोथरूडकरांनी अमली पदार्थ विरोधात शंखनाद केला. दरम्यान, अमली पदार्थांविरोधातील लढा तीव्र करण्यासाठी अमली पदार्थ विक्रीची माहिती देणाऱ्याला दहा हजार रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

शिवाजी रायगड स्मारक, अंकुर प्रतिष्ठान, शिवश्री प्रतिष्ठान, अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद, अग्रेसर भारत आदी संघटनाच्या वतीने कोथरूड येथील हुतात्मा राजगुरू चौक येथे निदर्शने करण्यात आली.

‘कोथरूडमधील नागरिकांनी एकत्रित येऊन सुरू केलेल्या अमली पदार्थ विरोधी चळवळीत सामान्य नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. सांगली सारख्या जिल्ह्यातील अमली पदार्थांचे साठे जप्त होत आहेत. त्यामुळे सांगलीचा पालकमंत्री या नात्याने विविध उपाययोजना केल्या जात असून पोलिसांना अमली पदार्थ विक्रीबाबत खात्रीशीर माहिती देणाऱ्यांना वैयक्तिकरित्या दहा हजार रुपयांचे बक्षीस दिले जात आहे. कोथरूडमध्येही अमली पदार्थ विक्रींची माहिती देऊन पोलिसांना सहकार्य करणाऱ्यांना बक्षीस दिले जाईल. तसेच व्यसनाधीन व्यक्तींना बाहेर काढण्यासाठी समुपदेशन केंद्र सुरू करण्यात येईल, ’ अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. यावेळी पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे उपस्थित होते.

‘झिरो टाॅलरन्स हेच पुणे पोलिसांचे अमली पदार्थ विरोधी धोरण आहे,’ असे पिंगळे यांनी सांगितले. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, महिला निदर्शनांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या.

Story img Loader