पुणे : कल्याणीनगर येथे झालेल्या मोटार अपघातानंतर तरुणांमधील व्यसनांचा गंभीर मुद्दा समोर आला असतानाच आता पूर्वेकडचे ऑक्सफर्ड मानल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात अंमली पदार्थ सापडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र या प्रकरणी विद्यापीठ प्रशासन ठोस कारवाई करत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे.
युवा सेनेचे शहरप्रमुख राम थरकुडे यांनी या संदर्भातील पत्र विद्यापीठाला दिले आहे. काही दिवसांपूर्वी विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळून आले होते. विद्यापीठाच्या आवारात अंमली पदार्थ सापडणे अत्यंत गंभीर आहे. या बाबत विद्यापीठाकडून तातडीने पावले उचलणे अपेक्षित असताना विद्यापीठाकडून काहीच करण्यात आले नाही. विद्यापीठात विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. तसेच विद्यार्थी चुकीच्या मार्गाला लागणार नाहीत याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या अनुषंगाने विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांचे वय, शिक्षण लक्षात घेता त्यांचे समुपदेशन करावे.
हेही वाचा…Pune Porsched Accident : “अपघाताची…”, अल्पवयीन मुलाच्या आईने चालकाकडे केली होती विनंती
तसेच विद्यापीठाने जागरूकता मोहिम राबवावी. या संदर्भात पोलिसांना कळवून अंमली पदार्थ पुरवणाऱ्या विकृतींवर कारवाई करण्यास विद्यापीठ प्रशासनाने मदत करावी. या पुढे पुढे विद्यापीठ आवारात तसेच महाविद्यालयांमध्ये अंमली पदार्थ येणार नाहीत यासाठी सतर्क रहावे आणि नशामुक्ती अभियान राबवावे. गेल्या दहा दिवसांत विद्यापीठ प्रशासनाकडून कुठलीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यापीठाची भूमिका आणि निष्क्रियता संशयास्पद आहे. दोन दिवसात या बाबत कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा थरकुडे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला.
हेही वाचा…कल्याणीनगर अपघातानंतर पोलिसांची कारवाई तीव्र, किती मद्यपी वाहनचालक जाळ्यात?
दरम्यान वसतिगृह प्रमुखांनी या संदर्भातील माहिती दिली असून, समिती नियुक्त करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे कुलसचिव डॉ. विजय खरे यांनी स्पष्ट केले.