राहुल खळदकर
पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील आणि त्याचा भाऊ भूषण यांनी अमली पदार्थ विक्रीतून (मेफेड्रोन) मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांच्या पथकाने पाटील याच्या नाशिक येथील घराची तपासणी केली. तेव्हा मोठ्या प्रमाणावर सोने सापडले.
ललित पाटीलचा भाऊ भूषण आणि साथीदार अभिषेक बलकवडे यांना नेपाळ सीमेवरुन पुणे पोलिसांच्या पथकाने अटक केली. भूषण आणि अभिषेकला न्यायालयने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलिसांच्या पथक अभिषेकला घेऊन नाशिकला रवाना झाले. अभिषेककडे चौकशी करण्यात आली. ललित आणि त्याचा भाऊ भूषण अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशातून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले तसेच नाशिक परिसरात जमीन खरेदी केल्याचे उघडकीस आले आहे. ललित अमली पदार्थ विक्रीचे व्यवहार करायचा. भूषण आणि अभिषेक मेफेड्रोन तयार करायचा. अभिषेक भूषणचा जवळचा मित्र असून, अमली पदार्थ विक्रीतून मिळालेल्या पैशांचे व्यवहार तो सांभाळत होता.
भूषणने रसायनशास्त्र विषयात अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केले आहे. रासायनिक पदार्थांची त्याला माहिती होती. नाशिक परिसरातील शिंदे गावात त्यांनी मेफेड्रोन तयार करण्याचा उद्योग सुरू केला होता. ललित मुंबईतील तस्करांना मेफेड्रोन कसे तयार करतात, याची माहिती (फॉर्म्युला) देणार होता. त्यासाठी तो तस्करांकडून मोठी रक्कम घेणार असल्याची माहिती तपासात मिळाली आहे.