राहुल खळदकर
पुणे : ससून रूग्णालयातून पसार झालेला अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलला चेन्नईत मुंबई पोलिसांच्या पथकाने पकडले. त्याला मुंबईतील न्यायालयाने शनिवारपर्यंत (२१ ऑक्टोबर) पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून, ललितची पोलीस कोठडी संपताच त्याला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहे. पुणे पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले आहे.
ससून रूग्णालयाच्या उपचाराच्या बहाण्याने दाखल झालेलाा अमली पदार्थ तस्कर ललित रुग्णालयातून मेफेड्रोनची विक्री करत असल्याचा धक्कादायक प्रकार २९ सप्टेंबर रोजी उघडकीस आला होता. ललितचे साथीदार सुभाष मंडल, रौफ शेख यांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांच्याकडून दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. २ ऑक्टोबर रोजी ललित बंदोबस्तावरील पोलिसांना गुंगारा देऊन ससून रुग्णालयातील उपचार कक्षातून पसार झाला. त्यानंतर ललितचा पुणे पोलिसांच्या पथकाने शोध सुरू केला. त्याला पकडण्यासाठी दहा पथके तयार करण्यात आली होती.
आणखी वाचा-धक्कादायक! ससून रुग्णालयात बेकायदा वसुलीचा वाहन‘तळ’
ललितने भाऊ भूषण, साथीदारांच्या मदतीने मुंबई, पुणे, नाशिकमध्ये मेफेड्रोनची विक्री केली होती. मलेशिया, थायलंड, दुबईत त्याने मेफेड्रोन विक्रीस पाठविले होते. मुंबई पोलिसांनी ललितला अटक केली आहे. त्याची पोलीस कोठडी संपताच पुणे पोलीस बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात ललितला अटक करणार आहेत. त्यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे.
ललितचा श्रीलंकेत पसार होण्याचा डाव
ससून रुग्णालयातून पसार झाल्यानंतर ललितने नाशिकमधील मैत्रिणीकडून २५ लाख रुपये घेतले. चेन्नईतून तो श्रीलंकेत पसार होण्याच्या तयारीत होता. गेले पंधरा दिवस पुणे पोलिसांचे पथक त्याला पकडण्यासाठी दिवसरात्र तपास करत होते. मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात ललित पसार होता. चेन्नईतून त्याने मित्राच्या मोबाइलवर संपर्क साधला. तांत्रिक तपासात ही माहिती मिळाल्यानंतर साकीनाका पोलिसांनी ललितला चेन्नईत पकडले.
आणखी वाचा-अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक; पुणे पोलिसांची कारवाई
आश्रय देणाऱ्यांचा शोध
२ ऑक्टोबर रोजी ललित ससून रुग्णालयातून पसार झाला. ससून ते चेन्नईपर्यंत त्याने प्रवास कसा केला. त्याला आश्रय कोणी दिला, यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येणार आहे. पसार झालेल्या ललितला कोणी मदत केली, याबाबतचा तपास केला जाणार आहे.