पुणे : बाणेर परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका परदेशी नागरिकास गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केली. त्याच्याकडून साडेचार लाख रुपयांचे २२ ग्रॅम कोकेन, दुचाकी, मोबाइल संच असा पाच लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी एका परदेशी नागरिकास अटक करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडकरांसाठी आंद्रा धरणातून ५० एमएलडी पाणी उचलण्यास सुरुवात
परदेशी नागरिक बाणेर भागातील एका सोसायटीत राहायला आहे. तो बाणेर-सूस लिंक रस्त्यावर कोकेनची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गस्त घालणाऱ्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून २२ ग्रॅम ४० मिलीग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेल्या कोकेनची किंमत चार लाख ४८ हजार रुपये आहेत. त्याच्याकडून दुचाकी, चार मोबाइल संच जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, सहायक आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड, सहायक निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे, शैलजा जानकर, मनोजकुमार साळुंके, मारुती पारधी, प्रवीण उत्तेकर, विशाल दळवी, पांडुरंग पवार, संदीप शिर्के, सुजीत वाडेकर आदींनी ही कारवाई केली.