पुणे : कल्याणी नगर अपघात प्रकरण ताजे असतानाच पुण्यात मद्यधुंद मोटर चालकाकडून अपघाताचा आणखी एक प्रकार घडला आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील मोटारीला मद्यधुंद  मोटरचालकाने  धडक दिली. त्यामधून पाटील हे बचावले. संबंधित मोटार चालकासह त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींना कोथरूड पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पाटील हे रात्री गणेश मंडळांना भेटी देऊन निघाले असताना कोथरूड परिसरात मोटार चालकाने धडक दिली. त्यामध्ये पाटील हे बचावले. पोलिसांनी तातडीने संबंधित मोटार चालक आणि मोटारीमध्ये असलेले त्याचे तीन मित्र आणि दोन मैत्रिणींना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी मोटारचालक हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणानंतर पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह मोहीम पोलिसांनी मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. मात्र, तरीही असे प्रकार घडत असल्याचे या अपघात प्रकरणानंतर उघडकीस  आले आहे.  कल्याणीनगर अपघात प्रकरणामध्ये संबंधित मोटारचालक अल्पवयीन मुलगा, त्याचे वडील आई, ससूनमधील डॉक्टर यांच्यावर कारवाई झाली आहे.

दहा दिवसांत ६०० गणेश मंडळांना भेटी

गेल्या दहा दिवसांमध्ये शहराच्या विविध भागातील ६०० गणेश मंडळांना भेटी देऊन गणपतीचे दर्शन घेतल्याचे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचे सरकार यावे, असे गणरायाला साकडे घातल्याचेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

मराठा आरक्षणाच्या विषयात देवेंद्र फडणवीस यांना  लक्ष्य करू नका देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण दिले. मराठा आरक्षणाबाबत तथ्य सोडून कोणीही काही बोलू नये.  राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण दिले. त्यानंतर महाविकास आघाडीच्या सरकारमधील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरक्षण घालवले. आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण दिले आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत कोणीही तथ्य सोडून बोलू नये. देवेंद्र फडणवीस यांना या विषयात लक्ष्य करण्यात येऊ नये, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drunk driver hit car of bjp mla chandrakant patil convoy in kothrud area pune print news rbk 25 zws