लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : नाकाबंदीत वाहतूक शाखेच्या पोलीस शिपायला धक्काबुक्की केल्याप्रकरणी मद्यपी वाहनचालकाविरुद्ध येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कल्याणीनगर भागात ही घटना घडली.

चिराग राजेंद्र मुंदडा (वय २९, रा. नारायण पेठ) असे गु्न्हा दाखल केलेल्या वाहनचालकाचे नाव आहे. याबाबत येरवडा वाहतूक शाखेतील पोलीस शिपाई संदीप खंडागळे यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शहरात दररोज रात्री नाकाबंदी करण्याचे आदेश करण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. भरधाव वेग, तसेच दारु पिऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.

आणखी वाचा-डेक्कन भागात पोलिसांवर हल्ला करुन पसार झालेला चंदन चोरटा गजाआड

येरवडा वाहतूक शाखेतील पाेलीस शिपाई संदीप खंडागळे आणि सहकाऱ्यांनी येरवड्यातील कल्याणीनगर भागात नाकाबंदी केली होती. कल्याणीनगर परिसरातील बिशप स्कूल परिसरात शुक्रवारी मध्यरात्री नाकाबंदी करुन वाहनचालकांची तपासणी करण्यात येत होते. त्यावेळी वाहनचालक चिराग मुंदडा याची तपासणी करण्यात आली. मुंदडा याने तपासणीस विरोध केला. खंडागळे यांच्या हातातील मोबाइल संच हिसकावून त्यांना धक्काबुक्की केली. तपासणीत मुंदडाने दारु पिऊन वाहन चालविल्याचे उघडकीस आले. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक लामखेडे तपास करत आहेत.

आणखी वाचा-कोथरूड विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाकडून माजी आमदार चंद्रकांत मोकाटे यांना उमेदवारी जाहीर

बेशिस्त वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी दररोज रात्री ११ ते पहाटे तीनपर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागांत नाकाबंदी करून वाहनचालकांची तपासणी सुरू करण्यात आली आहे. नाकाबंदीसाठी शहर, उपनगरातील २७ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. या मोहिमेत सहायक पोलीस आयुक्तांसह १२५ पोलीस कर्मचारी सहभागी होणार आहेत. बेशिस्त वाहनाचालकांना शिस्त लावण्यासाठी दररोज रात्री नाकाबंदी करण्यात येत आहे.