पिंपरी : पुण्यातील स्वारगेट स्थानकात तरुणीवर झालेल्या अत्याचार प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड शहरातील वल्लभनगर आगरातील सुरक्षेमध्ये अनेक त्रुटी असल्याचे समाेर आले आहे. परिसरात मद्यपींचा वावर आणि सुरक्षेची सहा सीसीटीव्हींवर भिस्त असल्याचे चित्र आहे. एसटी प्रशासनाकडून स्थानक परिसरात अधिक सीसीटीव्ही बसविण्यासाठी महामेट्रोला पत्र देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील वल्लभनगर स्थानकातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला ३२७, मुंबईला १८३ एसटी बस ये-जा करतात. वल्लभनगर आगराच्या ३० बस येथून सुटतात. दरराेज हजाराे प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करतात. स्थानकात पुरेशी सुरक्षा नसल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. स्थानक आणि परिसरात मद्यपींचा वावर वाढला आहे. छाेट्या-माेठ्या चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. स्थानकात प्रवेश करण्यासाठी दाेन मुख्य मार्ग आहेत. तेथे प्रवेशद्वार नाही. त्यामुळे खासगी वाहने आगारात येतात. मागील बाजूला खासगी वाहने उभी केली जातात.

स्थानकाच्या रंगरंगाेटीवेळी काही ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे काढण्यात आले. सद्य:स्थितीत केवळ सहा कॅमेरे येथे आहेत. स्थानकात बहुतांश भाग हा कॅमेऱ्याच्या नजरेत नाही. संत तुकाराम मेट्राे स्थानकाच्या बाजूने एसटीचे वाहनतळ असून, या ठिकाणी कॅमेरे नाहीत. परिसराच्या स्वच्छतेसाठी केवळ सहा सफाई कर्मचारी आहेत. राज्याच्या विविध भागांतून आगरात २३० बस मुक्कामी असतात. या वाहनांचा आडाेसा घेऊन मद्यपी रात्री बसलेले आढळून येतात. आगराच्या सुरक्षेची जबाबदारी दहा सुरक्षारक्षकांवर आहे. तीन पाळ्यांमध्ये सुरक्षारक्षक तैनात असतात. बहुतांश वेळा सुरक्षारक्षक जागेवर नसल्याचे दिसून येते.

पाेलीस मदत केंद्र बंद

आगारात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि स्थानक परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पाेलीस मदत केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र, अनेकदा मागणी करूनही या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपलब्ध होऊ शकले नसल्याचे एसटी प्रशासनाचे म्हणणे आहे. रंगरंगोटीनंतर मदत केंद्राचा फलकदेखील दिसून येत नसून, सध्या ते कुलूपबंद अवस्थेत आहे.

स्थानक परिसरात १० सुरक्षारक्षक आहेत. आगरात २३० मुक्कामी बस असतात. शिवशाही बस आगराच्या आतील बाजूला उभ्या करणे, बसचे दरवाजे बंद करूनच बाहेर पडण्याच्या सूचना चालक, वाहकांना दिल्या आहेत. सहा ‘सीसीटीव्ही’ कार्यान्वित असून, आगराच्या पाठीमागील बाजूस ‘सीसीटीव्ही’ बसविण्यासाठी महामेट्रोला पत्र देण्यात येणार असल्याचे वल्लभनगर आगर व्यवस्थापक बालाजी सूर्यवंशी यांनी सांगितले.