लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: दारूच्या नशेत दुचाकी चोरून पेट्रोल संपल्यानंतर दुचाकी सोडून पसार होणाऱ्या सराइताला लष्कर पोलीस ठाण्याच्या पथकाने अटक केली. चोरट्याकडून आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.
आसिफ अकबर शेख (वय ३०, रा. भाग्योदयनगर, कोंढवा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. लष्कर परिसरातून एक दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. सराईत चोरटा आसिफ शेखने दुचाकी चोरल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. चौकशीत त्याने दारूच्या नशेत दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. दुचाकीतील पेट्रोल संपल्यानंतर दुचाकी सोडून पसार झालो, असे त्याने सांगितले. शेखने आठ दुचाकी चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे, अशी माहिती परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आणखी वाचा-पुणे: उच्चशिक्षित पत्नीकडून पतीला कायमस्वरूपी पोटगी
शेखने कोंढवा, तसेच खेड परिसरातून दुचाकी चोरल्याचे उघड झाले आहे. त्याच्या विरुद्ध चोरीचे गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलीस आयुक्त आर. राजे, वरिष्ठ निरीक्षक राजेश तटकरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक प्रियंका शेळके, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, उपनिरीक्षक महेंद्र कांबळे, महेश कदम, लोकेश कदम, सागर हराळ, समीर तांबोळी, रमेश चौधर, किसन भारमळ, अतुल मेंगे, कैलास चव्हाण, शिंदे आदींनी ही कारवाई केली.