लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : मद्यपी वाहनचालकांची तपासणी (ड्रंक अँड ड्राइव्ह) करणाऱ्या पोलिसांना वाहनचालकाने धक्काबुक्की करुन धमकी दिल्याची घटना पुणे रेल्वे स्थानक परिसरात घडली. याप्रकरणी वाहनचालकाविरुद्ध बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी शशांक अवध त्रिपाठी (वय ३६, रा. वाघोली) याच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कर्मचारी दीपमाला नायर यांनी फिर्याद दिली आहे. रविवारी मध्यरात्री पावणेएकच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानक परिसरात पोलीस कर्मचारी दीपमाला, तसेच अधिकाऱ्यांनी नाकाबंदी करुन मद्यपी वाहनचालकांची तपासणी करण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिसांनी नाकाबंदीत मोटारचालक त्रिपाठीला अडवले. त्याची तपासणी करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी अडवल्याने त्रिपाठी चिडला.‘ तुम सबको मैं घर बिठाउंगा, कल बताता हू मैं कोन हू’ अशी धमकी त्याने दिली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्रिपाठीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक धीरज गुप्ता तपास करत आहेत.

आणखी वाचा-ब्रिटीश गायक ॲलन वॉकर रजनीत चोरट्यांचा धुमाकूळ, ३६ मोबाइल चोरी; चौघे गजाआड

शहरात पोलिसांना धक्काबुक्की करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कोंढव्यात वाहतूक कोंडी सोडविणाऱ्या पोलिसांवर कोयता उगारुन त्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एका दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. हडपसर भागातील गंगानगर भागात वाहतूक नियमन करणाऱ्या पोलिसाच्या पोटात पोलीस कर्मचाऱ्याने लाथ मारली होती. वानवडीत दीड महिन्यांपूर्वी भांडणात मध्यस्थी करणाऱ्या सहायक पोलीस निरीक्षकाच्या डोक्यात सराइतांनी कोयत्याने वार केल्याची घटना घडली होती.