पुणे : मद्यपी रिक्षाचालकाचा बेदरकारपणा प्रवाशाच्या जीवावर बेतला. नगर रस्त्यावरील आगाखान पॅलेसजवळ विरुद्ध दिशेने निघालेल्या मद्यपी रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. धरमवीर राधेशाम सिंग (वय ३८, रा. वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या रिक्षा प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी रिक्षाचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पराग शर्मा (वय २८, रा. चंदननगर) यांनी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा >>> एमएचटी-सीईटीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू… कधीपर्यंत भरता येणार अर्ज?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री भरधाव रिक्षा नगर रस्त्याने विरुद्ध दिशेने निघाली होती. आगाखान पॅलेसजवळ रिक्षा उलटली. रिक्षातील प्रवासी धरमवीर सिंग यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. अपघातात रिक्षाचालकाला किरकोळ दुखापत झाली. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेले धरमवीर यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा >>> आरटीईअंतर्गत शाळा नोंदणी सुरू… विद्यार्थी नोंदणी कधीपासून?
रिक्षाचालकाला पोलिसांनी नोटीस बजावली आहे. रिक्षाचालकाने मद्यप्राशन केल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक महेश लामखेडे तपास करत आहेत.
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू नगर रस्त्यावर खराडी भागात भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली. दादासाहेब भगवान कुडक (वय ३६, रा. चंदननगर) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुडक यांच्या पत्नी आरती (वय ३६) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीस्वार कुडक रविवारी दुपारी सव्वातीनच्या सुमारास नगर रस्त्याने निघाले होते. त्यावेळी खराडी बाह्यवळण मार्गाजवळ भरधाव ट्रकने दुचाकीस्वार कुडक यांना धडक दिली. अपघातात त्यांचा जागीचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक रवींद्र ढावरे तपास करत आहेत.