पिंपरी : मद्यप्राशन करून रस्त्यात गोंधळ करणाऱ्यांना समजविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की झाल्याची घटना खेड तालुक्यातील येलवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. निलेश देविदास बोत्रे (वय ३५), जयवंत लक्ष्मण पवार (वय ३७), गोरख सुभाष गाडे (वय ३१, सर्व रा. येलवाडी, खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
याप्रकरणी पोलीस अंमलदार शंकर आडे यांनी म्हाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश, जयवंत आणि गोरख हे शनिवारी रात्री उशिरा मद्यप्राशन करून रस्त्यात गोंधळ घालत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार आडे हे सहकाऱ्यांसोबत गस्तीवर होते. तिघेजण रस्त्यात गोंधळ घालत असल्याचे दिसल्याने आडे यांनी तिघांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मद्यप्राशन केलेल्या तिघांनी पोलिसांना शिवीगाळ करून दमदाटी केली. त्यानंतर पोलिसांसोबत धक्काबुक्की करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.