पहिल्या चित्रपटाचा अनुभव, चुकत-चुकत म्हटलेले पहिले संवाद, नायकांबरोबर झालेली निखळ मैत्री अशा आठवणींनी तीन वेगवेगळ्या पिढय़ांच्या मनावर राज्य करणाऱ्या मराठी अभिनेत्रींचा प्रवास उलगडला.
डी. एस. कुलकर्णी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘डीएसके गप्पा’ या कार्यक्रमात सीमा देव, मधू कांबीकर, वर्षां उसगांवकर आणि सोनाली कुलकर्णी यांनी रसिकांशी मनमोकळा संवाद साधला. राज काझी यांनी त्यांची मुलाखत घेतली.
घरात फारसे चित्रपट पाहण्याची सवय नसताना चित्रपटात काम करण्यास सुरुवात केल्याच्या आठवणी देव यांनी सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘‘दत्ता धर्माधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला ‘आलिया भोगासी’ हा माझा पहिला चित्रपट होता. मी संवाद म्हणताना चुकले की बरोबरचे कलाकार माझी थट्टा करत. मला काम सोडून परत जावेसे वाटे. पण आई आणि घर डोळ्यांसमोर उभे राही. त्यानंतर व्ही. अवधूत यांच्या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. त्या चित्रपटानंतर मी आणि रमेश देव यांची जोडी चांगली चालली.’’
लोकरंगभूमीवरून आलेली मुलगी ते अभिनेत्री हा प्रवास ‘शापित’ या चित्रपटाने पार झाला असे कांबीकर यांनी सांगितले. या चित्रपटाच्या ‘स्क्रीन टेस्ट’च्या वेळी अस्सल नगरी भाषेत बोलून दाखवलेले संवाद म्हणून दाखवून त्यांनी उपस्थितांची उत्स्फूर्त दाद मिळवली. दादा कोंडके यांच्या मिस्किलपणाच्या आठवणीही त्यांनी सांगितल्या.
अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत बेर्डे या ‘सुपरस्टार्स’बरोबरच्या कामाचा अनुभव उसगांवकर यांनी सांगितला. त्या म्हणाल्या, ‘‘लक्ष्या आणि अशोक सराफ यांच्याबरोबर पडद्यावर ‘रोमँटिक’ सीन करणे अवघड असे. ‘एक होता विदूषक’मध्ये मी आणि लक्ष्या यांनी एकत्र प्रथमच रोमँटिक भूमिका गंभीरपणे रंगवल्या. अजिंक्य देव यांच्याबरोबर माझी पडद्यावरची जोडी चांगली जमली आणि आमची छान मैत्रीही झाली.’’
‘ग्रँड मस्ती’ या हिंदी चित्रपटाचा अनुभव सोनाली हिने उलगडला. ती म्हणाली, ‘‘दिग्दर्शक इंदर कुमार यांनी माझे ‘अजिंठा’ चित्रपटातील काम पाहिले होते. असे चित्रपट बघताना मी फारशी ‘कंफर्टेबल’ नसते, पण त्या चित्रपटातील सगळ्यात सोज्वळ भूमिका मला मिळाली होती. त्यानंतर ‘सिंघम रिटर्न्स’मध्ये काम करण्याचा अनुभवही चांगला होता.’’
तीन पिढय़ांच्या तारकांचा प्रवास उलगडला!
पहिल्या चित्रपटाचा अनुभव, चुकत-चुकत म्हटलेले पहिले संवाद, नायकांबरोबर झालेली निखळ मैत्री अशा आठवणींनी तीन वेगवेगळ्या पिढय़ांच्या मनावर राज्य करणाऱ्या मराठी अभिनेत्रींचा प्रवास उलगडला.
First published on: 06-04-2015 at 02:55 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dsk gappa seema dev sonali kulkarni