रात्रीच्या पुण्याची विविध रुपे आहेत. अस्सल खवय्यांसाठी तर रात्रीचे पुणे म्हणजे पर्वणीच. याच पर्वणीत आणखी एक भर अलीकडच्या काळात पडली आहे आणि ती आहे मसाला दुधाची. गरम मसाला दूध विक्रीचे नवे कट्टे शहरात अनेक ठिकाणी सुरू झाले असून तरुणाईच्या उदंड प्रतिसादामुळे हे कट्टे चांगलेच बहरल्याचे ठिकठिकाणचे चित्र आहे.
छोटय़ा हातगाडीवर किंवा छोटय़ा टेबलावर ठेवलेली गॅसची नाही तर कोळशाची शेगडी. या शेगडीवर उकळत असलेले गरम दूध आणि शेगडीभोवती मसाला दुधाचा आस्वाद घेत असलेले पुणेकर असे चित्र आता चौकाचौकात पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी हे दूध नुसतेच मसालायुक्त नसते तर ते सुकामेवायुक्तदेखील असते. काहीजण ग्राहकांच्या मागणीनुसार गरम दुधात हळदही घालून देतात.
शहरातील सदाशिव पेठेतील नागनाथ पाराजवळ कमलेश खिंवसरा या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांने हा व्यवसाय सुरू केला आहे. कमलेश एमएमसीसीमध्ये वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्गात शिकतो. वर्षभरापूर्वी त्याने हा व्यवसाय सुरू केला. तो म्हणाला की, मला पाककलेची आवड आहे. त्यामुळे त्याच क्षेत्रात काही तरी करायची माझी इच्छा होती. आम्ही घरातले सगळेजण अनेक वेळा रात्री दूध प्यायला विविध ठिकाणी जायचो. त्यातूनच माझ्या मनात मसाला दूध विक्रीची कल्पना आली. मी माझ्या मोठय़ा भावाला ही कल्पना सांगितली. त्यानेही लगेच ही कल्पना उचलून धरली आणि या व्यवसायाला प्रारंभ झाला.
रोजची तयारी नेमकी कशी करावी लागते या बाबबत कमलेश म्हणाला की, दूधविक्री सुरू करण्याच्या आधीच त्याची तयारी घरी सुरू करावी लागते. रात्री नऊच्या सुमारास आम्ही दूधविक्रीला सुरुवात करतो. दररोज साधारणपणे चाळीस लिटर दूध लागते. दूध उकळत असतानाच त्यात काजू, बदाम, पिस्ता, बेदाणे असा सुकामेवा टाकतो. दूध सतत उकळत ठेवावे लागते. जेणेकरून ते घट्ट व्हावे आणि त्याला खमंग चव यावी. आमच्याकडे मुख्यत्वेकरून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी मोठय़ा संख्येने येतात. सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, अभ्यासिका आणि विद्यार्थ्यांची राहण्याची ठिकाणे यांचे प्रमाण खूप मोठे असल्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या खूप असते.
सध्या तरी मी आवड म्हणून फावल्या वेळात हा व्यवसाय करत आहे. शिक्षण पूर्ण झाल्यावर व्यवसाय वाढवण्याचाही विचार आहे. दुधाबरोबरच अन्य काही पदार्थाचीही विक्री सुरू करण्याचे मनात आहे, असे कमलेशने सांगितले.
दही, ताक, दूध, लस्सी, खवा वगैरेंची विक्री करणाऱ्या ज्या डेअऱ्या पुण्यात आहेत या डेअऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी कढईतील दूध मिळते. मात्र त्या लवकर बंद होतात. त्यापुणे शहरात रात्रीच्या वेळी जेथे दूधविक्री सुरू झाली आहे त्या ठिकाणांना चांगला प्रतिसाद आहे. हे दूध उकळत उकळत आटत जाते. त्यामुळे अशा मलईयुक्त दुधाचा आस्वाद ही खवय्यांसाठी पर्वणीच ठरत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा