लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : इंडियन ओव्हरसीज बँकेच्या इंदापूर तालुका शाखेत आठ कोटी रुपयांचा गैरव्यवहार केल्याप्रकरणी दूधगंगा सहकारी दूध उत्पादक संघाचे माजी संचालक अविनाश घोलप यांच्यासह बँकेचे तत्कालीन शाखा व्यवस्थापकासह तिघांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय-एसीबी) न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी याबाबतचे आदेश दिले.

अविनाश राजेंद्रकुमार घोलप (वय ५८, रा. घोलपवाडी, इंदापूर), बँकेचेतत्कालीन शाखा व्यवस्थापक लक्ष्मण रामचंद्र राठोड (वय ३९, रा. लिंगापूर, असिफाबाद), व्यावसायिक हनुमंत गोरख साळुंखे (वय ४०, रा. करमाळा, जि. सोलापूर) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. राठोड यांना दीड लाख रुपये, तसेच घोलप आणि साळुंखे यांना प्रत्येक ९५ हजार रुपये दंडही न्यायालयाने ठोठावला आहे. याबाबत इंडियन ओव्हरसीज बँकेचे तत्कालीन वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक एस. के. श्रीवास्तव यांनी तक्रार दिली होती.

आणखी वाचा- उद्योगनगरीला गुन्हेगारीचा विळखा

गैरव्यवहार जुलै २०१३ ते जुलै २०१६ या कालावधीत झाला होता. या खटल्यात विशेष सरकारी वकील अभयराज आरीकर यांनी बाजू मांडली. सरकार पक्षाकडून १८ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक राठोड यांनी कृषी कर्ज आणि किसान क्रेडिट कार्ड योजनेचे एकूण ७.कोटी ७४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या लेखी परवानगीशिवाय घोलप आणि साळुंखे यांच्या खात्यावर वर्ग करून बँकेचे नुकसान केले होते.