पिंपरी : महामेट्राेच्या कामामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची निगडीत जलवाहिनी फुटल्याने लाखाे लीटर पाणी वाया गेले. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास खाेदाई करत असताना जलवाहिनी फुटल्याने पाण्याचे फवारे उडत हाेते. त्यामुळे रस्त्यावर पाणीच पाणी झाले होते.
निगडी ते पिंपरी या मार्गावर महामेट्राेचे काम सुरू आहे. निगडीतील टिळक चाैक परिसरात मेट्राेच्या खांबासाठी पाेकलेनच्या सहाय्याने खाेदाई सुरू आहे. या खाेदाई दरम्यान महापालिकेची आकुर्डी, खंडाेबा माळ चाैकाकडे जाणारी ६०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी फुटली. सुमारे तासभर पाण्याची गळती सुरू हाेती. लाखाे लीटर पाणी वाया गेले. यामुळे निगडी ते बजाज अँटाे या मार्गावर पाणीच पाणी झाले हाेते. या पाण्यातून जाताना वाहन चालकांना माेठी कसरत करावी लागली. ही जलवाहिनी फुटल्यामुळे आकुर्डी, उद्याेमनगर आणि परिसरातील पाणी पुरवठ्यावर काही प्रमाणात परिणाम झाला.
साडेपाच वर्षांपासून एक दिवसाआड पाणी पुरवठा
शहरात मागील साडेपाच वर्षांपासून दिवसाआड पाणी पुरवठा सुरू आहे. उन्हाळा सुरू झाल्याने पाण्याची मागणी वाढली आहे. शहरातील अनेक भागात अपुरा, कमी दाबाने, विस्कळीत पाणी पुरवठा हाेत असल्याच्या तक्रारी येत आहेत. एक दिवसाआडही पुरेसा पाणी पुरवठा हाेत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी असतानाच जलवाहिनी फुटल्याने लाखाे लिटर पाणी वाया गेले आहे. जलवाहिनी फुटल्याने महामेट्रोच्या ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे.
मेट्राेच्या कामामुळे निगडीत जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटताच पाणी पुरवठा खंडीत केला. जलवाहिनीच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. पाणी पुरवठ्यावर काही परिणाम झाला नसल्याचा दावा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता – प्रमाेद ओंभासे यांनी केला आहे.