पुणे: गोदामाच्या ‌भाड्यावरुन झालेल्या वादातून गोदाम मालकाला गजाने बेदम मारहाण करुन त्याचा खून करण्यात आल्याची घटना नगर रस्ता भागात घडली. गोदाम मालकाचा अपघात झाल्याचा बनाव रचणाऱ्या आरोपीला लोणीकंद पोलिसांनी अटक केली असून, साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बाजीराव सुदाम खांदवे (वय ५५, रा. हरणतळ वस्ती, लोहगाव) असे खून झालेल्या गोदाम मालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी लक्ष्मण नारायण इमनेलू (वय ३८, रा. पाटोदा खुर्द, ता. धर्माबाद, जि. नांदेड) याला अटक करण्यात आली आहे. त्याचे साथीदार मुख्य सूत्रधार नागेश नाईक याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खांदवे यांचे लाेहगाव भागातील पठारे वस्तीत गोदाम आहे. आरोपी नागेश नाईक याला त्यांनी गोदाम भाड्याने दिले होते.

हेही वाचा… देहूकरांच्या विरोधानंतर पोलीस आयुक्तालयासाठी आता मोशीतील गायरान जागेची चाचपणी

गोदामच्या ‌भाड्यावरुन खांदवे आणि नाईक यांच्यात वाद झाला होता. खांदवे यांना नाईकने गोदामात बोलावून घेतले. तेथे नाईक आणि साथीदारांनी खांदवे यांना गजाने बेदम मारहाण करुन खून केला. त्यानंतर खांदवे यांचा मृतदेह रिक्षात टाकून वाघोलीतील खाणीत टाकून दिला. खांदवे यांचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव त्यांनी रचला होता. पाच दिवसांपूर्वी वाघोलीतील खाणीत एकाचा मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. खांदवे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शवविच्छेदनात खांदवे यांचा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी नमूद केले होते. खांदवे यांची ओळख पटलेली नव्हती. दरम्यान, खांदवे बेपत्ता झाल्याची तक्रार विमानतळ पोलिसांकडे देण्यात आली होती.

हेही वाचा… पुनावळेतील प्रस्तावित कचरा डेपोला स्थानिकांचा विरोध

लोणीकंद पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरू केला. खांदवे यांचे गोदाम भाड्याने घेणारा आरोपी नाईक आणि चार कामगार गोदाम सोडून गेल्याची माहिती पोलिसांना तपासात मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तपास करुन आरोपी इमनेलूला ताब्यात घेतले. सुरुवातीला इमनेलूने पाेलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी खांदवे यांचा खून केल्याची कबुली दिली. पोलीस उपायुक्त शशिकांत बोराटे, सहायक आयुक्त संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक मारुती पाटील, सीमा ढाकणे, सहायक निरीक्षक रवींद्र गोडसे, हवालदार संदीप तिकोणे, स्वप्निल जाधव, अजित फरांदे, कैलास साळुंके, शुभम चिनके, परमेश्वर आघाव, आशिष लोहार आदींनी ही कारवाई केली.