पुणे: कौटुंबिक वादातून एकाने पेट्रोल ओतून पेटवून घेतल्याची घटना येरवड्यातील लूप रोड परिसरात सोमवारी घडली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा गोल्फ क्लब रस्त्याने जाणार होता. त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बंदोबस्तावरील पोलिसांनी पेटवून घेणाऱ्या व्यक्तीला त्वरित रुग्णालयात दाखल केले.
बबलू माणिक गायकवाड (वय ४०, रा. लक्ष्मीनगर, येरवडा) असे गंभीर भाजलेल्याचे नाव आहे. येरवड्यातील लूप रोड परिसरात पीएमपी बस थांब्याजवळ एका व्यक्तीने पेटवून घेतल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला सोमवारी दुपारी मिळाली. त्याचवेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ताफा तेथून जाणार होता. त्यामुळे येरवड्यातील गोल्फ क्लब रस्त्यावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
हेही वाचा… मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव शुक्रवारपासून
पाेलिसांनी त्वरित गायकवाड यांना रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक चौकशीत कौटुंबिक वादातून गायकवाड यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली आहे. गायकवाड यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.