पुणे : प्राप्तिकर विभागाकडून सध्या करदात्यांना चालू आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहारांबाबत नोटिशी पाठवण्यात येत आहेत. विभागाने पाठविलेल्या वार्षिक माहिती विधानात (एआयएस) अनेक करदात्यांचे व्यवहार शंभरपट जास्त दाखविण्यात आले असून, त्यावरील आगाऊ करभरणा वेळेत करण्यास बजावण्यात आले आहे. त्यामुळे अनेक करदात्यांची धावपळ उडाली आहे. अखेर प्राप्तिकर विभागाने ही तांत्रिक चूक असल्याचे कबूल करीत त्यात दुरुस्ती करण्याचे पाऊल उचलले आहे.
प्राप्तिकर विभागाकडून आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील आर्थिक व्यवहारांसाठी करदात्यांना नोटिसा बजावण्यात येत आहे. या नोटिशीसोबत करदात्यांचे वार्षिक माहिती विधानही (एआयएस) जोडण्यात आले आहे. त्यात अनेक करदात्यांचे व्यवहार शंभर पटीने जास्त दाखविण्यात आले आहेत. आपल्या खात्यावरील व्यवहार कशामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढले, याबद्दल करदात्यांना काहीच माहिती मिळत नव्हती. यामुळे अनेक करदात्यांनी सनदी लेखापालांकडे धाव घेतली.
हेही वाचा >>>मराठा समाजाचे मावळ, शिरूर, पुणे,बारामतीत हजारो उमेदवार? मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय
सनदी लेखापालांकडे अनेक करदात्यांनी याबाबत तक्रारी केल्या. याचबरोबर अनेक जणांनी प्राप्तिकर विभागाकडेही याची तक्रार केली. यानंतर प्राप्तिकर विभागाच्या निदर्शनास ही चूक आली. यावर प्राप्तिकर विभागाने आता चूक दुरूस्त करण्याची भूमिका घेतली आहे. करदात्यांचे वार्षिक माहिती विधान अद्ययावत केले जाणार असून, तोपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
वार्षिक माहिती विधान म्हणजे काय?
प्राप्तिकर विभागाने काही वर्षांपूर्वी वार्षिक माहिती विधान (ॲन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट – एआयएस) आणले. हे ‘फॉर्म २६एएस’चे विस्तारित स्वरूप आहे. त्यात करदात्याची सर्वसमावेशक माहिती अनुपालन संकेतस्थळावर पाहता येते आणि त्यावर ऑनलाइन अभिप्रायसुद्धा देता येतो. याचबरोबर या माहितीचा सारांशदेखील सरलीकृत माहिती सारांश (टीआयएस) या स्वरूपात वेगळा पाहता येतो. ‘एआयएस’मध्ये व्याज, लाभांश, समभागाशी संबंधित व्यवहार, म्युच्युअल फंड व्यवहार, परदेशी प्रेषण माहिती वगैरे आणि अतिरिक्त माहिती समाविष्ट असते.
आगाऊ कर भरण्याबाबत करदात्यांना नोटिशी पाठविण्यात आल्या होत्या. एका संस्थेकडून मिळालेल्या चुकीच्या माहितीमुळे करदात्यांना चुकीची नोटीस पाठविण्यात आली. या संस्थेला माहिती अद्ययावत करण्यास सांगण्यात आले आहे. वार्षिक माहिती विधानातील माहिती अद्ययावत केली जाईल. त्याआधारे करदात्यांना सुधारित माहिती पाठविली जाणार असून, तोपर्यंत त्यांनी प्रतीक्षा करावी.– प्राप्तिकर विभाग