पुणे : रेल्वे फाटकावरील कर्मचारी (गेटमन) आणि स्थानिक नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे रेल्वेगाडीखाली आत्महत्या करण्यासाठी आलेल्या ६२ वर्षीय महिलेचा जीव वाचला. उरूळी कांचन परिसरातील कोरेगाव मूळ येथे मध्यरात्री ही घटना घडली.
दीपाली राजकुमार सिंग (वय ६२, रा. कांचनगृह सोसायटी, कोरेगाव मूळ, ता. हवेली, जि. पुणे) असे बचावलेल्या महिलेचे नाव आहे. दीपाली सिंग आणि त्यांचे पती कोरेगाव मूळ भागातील कांचनगृह सोसायटीत राहायला आहेत. त्यांना दोन मुले आहेत. एक मुलगा बंगळुरूत अभियंता आहे. त्यांचा दुसरा मुलगा लष्कराच्या कमांड रुग्णालयात कामाला आहे. दीपाली गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहेत. पती आणि दीपाली यांच्यात वाद झाल्याने त्या मध्यरात्री कोरेगाव मूळ परिसरातील लोहमार्गावर आल्या.
हेही वाचा… पुणे : पादचाऱ्यांना लुटणारा चोरटा अटकेत; आठ मोबाईल संच जप्त
हेही वाचा… महिलेला काढायला लावल्या १५० उठाबशा; देहूरोड येथील घटना
मध्यरात्री अडीचच्या सुमारास एक महिला रुळावर बसल्याचे रेल्वेच्या गेटमनने पाहिले. त्यांनी रेल्वे फाटकाशेजारी राहणारो समीर घावटे आणि सुप्रिया घावटे यांना या घटनेची माहिती दिली. गेटमन आणि घावटे दाम्पत्याने लोहमार्गावर धाव घेतली आणि दीपाली यांना बाजूला नेले. आजारपणामुळे दीपाली यांना चालता येत नव्हते. गेटमन आणि घावटे दाम्पत्याने त्यांना धीर दिला. पोलीस पाटील वर्षा कड, सचिन कड तसेच लाेणी काळभोर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक किरण धायगुडे यांना घटनेची माहिती कळविण्यात आली. दीपाली यांना धीर देऊन त्यांना घरी सोडण्यात आले. गेटमन आणि घावटे दाम्पत्याने प्रसंगावधान राखून दीपाली यांचे प्राण वाचवले.