पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरीच्या नेत्यांना स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच शहरातील अनेक स्वयंघोषित नेते प्रदेशात जाण्यास इच्छुक असताना सर्वानाच ठेंगा दाखवण्यात आला आहे.
पुण्यातून आमदार माधुरी मिसाळ, योगेश गोगावले, मेधा कुलकर्णी यांना प्रदेश कार्यकारिणीत चिटणीसपदावर काम करण्याची संधी देण्यात आली. मावळातून आमदार बाळा भेगडे यांना सरचिटणीस बनवून त्यांची ताकद वाढवण्यात आली. पिंपरीतून अनेक जण प्रदेशावर जाण्यासाठी तीव्र इच्छुक होते. आपली वर्णी लागणारच, असा दावा ते खासगीत करत होते. एक माजी नगरसेवक महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष होण्यास उत्सुक होत्या. प्रत्यक्षात कोणालाही संधी मिळाली नाही.
पिंपरी-चिंचवडमध्ये पक्षाची अलीकडच्या काळात खराब कामगिरी लक्षात घेऊनच असा निर्णय झाल्याचे बोलले जाते. शहरात भाजपला मानणारा मोठा वर्ग आहे. लोकसभा निवडणुकीत शरद पवार, अजित पवार उमेदवार असतानाही शहरातून लाखाच्या आसपास मते भाजप उमेदवाराला मिळत होती. नुकत्याच झालेल्या पालिका निवडणुकीत पक्षाचे अवघे तीन नगरसेवक निवडून आले. विधानसभा निवडणुकीत गटबाजीमुळे भाजप उमेदवाराचा थोडक्यात पराभव झाला, या बाबी वरिष्ठ नेत्यांनी लक्षात घेतल्याचे सांगण्यात येते. याविषयी कोणीही भाष्य करण्यास तयार नव्हते.
खराब कामगिरीमुळेच पिंपरीतील नेत्यांना भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत स्थान नाही
पिंपरी-चिंचवड शहरातील पक्षाच्या अतिशय खराब कामगिरीमुळे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत पिंपरीच्या नेत्यांना स्थान नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
First published on: 24-05-2013 at 02:30 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to bad performance pimpri bjp no one place in state executive