राहुल खळदकर
पुणे : कांद्यापाठोपाठ बटाटय़ाची राज्यातील प्रमुख बाजार समितीच्या आवारात बेसुमार आवक होत आहे. मागणीअभावी कांद्याचे दर कोसळले असतानाच बटाटय़ाच्या दरातही घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो बटाटय़ाची विक्री २० रुपयांना केली जात आहे. बटाटय़ांची मुबलक आवक झाल्याने वर्षभर बटाटा स्वस्त राहणार आहे.
राज्यातील सर्व बाजार समित्यांच्या आवारात कांद्याची बेसुमार आवक होत आहे. कांद्याला मागणी नसल्याने दर कमी झाले आहेत. वाहतूक, लागवड खर्चही न मिळाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाने कांद्याला तडाखा दिल्याने शेतकऱ्यांच्या डोळय़ांत पाणी आले आहे. आता कांद्यापाठोपाठ बटाटय़ाची बाजारात मोठी आवक आहे. नवी मुंबईतील वाशी, पुण्यातील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डासह राज्यातील प्रमुख बाजार आवारात बटाटय़ाची आवक वाढली आहे. बटाटय़ाला मागणी नसल्याने दरातही घट झाल्याचे मार्केट यार्डातील बटाटा व्यापारी राजेंद्र तथा अप्पा कोरपे यांनी सांगितले.
सध्या बाजारात आग्रा, इंदूर, गुजरात, तसेच स्थानिक भागातून बटाटय़ाची आवक होत आहे. पुणे जिल्ह्यातील खेड, मंचर, नारायणगाव भागांत बटाटय़ाची लागवड केली जाते. मात्र, या भागातील बटाटय़ाचे उत्पादन संपूर्ण राज्याची गरज भागवू शकत नाही. उत्तरेकडील राज्यांत बटाटय़ाची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाते. त्या राज्यांतून संपूर्ण देशभरात बटाटा पाठविला जातो. सध्या बाजारात उत्तरेकडील राज्यांतून बटाटय़ाची आवक मोठय़ा प्रमाणावर होत असली तरी फारशी मागणी नाही. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात दरात घट झाली असल्याचे कोरपे यांनी नमूद केले.
किरकोळ बाजारात..
उत्तरकेडील राज्यांतून बटाटय़ाची आवक वाढली आहे. बटाटा मुबलक असून, वर्षभर तो स्वस्त राहणार आहे. त्याच्या दरवाढीची शक्यता नाही. घाऊक बाजारात १० किलो बटाटय़ाला प्रतवारीनुसार ५० ते १४० रुपये असा दर मिळाला आहे. किरकोळ बाजारात त्याचा दर प्रतिकिलो २० रुपये आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात आग्रा, इंदूर, गुजरात आणि स्थानिक भागातून दररोज ३० ते ३५ ट्रकमधून पाच हजार पिशव्या बटाटय़ाची आवक होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक मुबलक आहे. घाऊक बाजारात एक किलो बटाटय़ाला आठ ते १२ रुपये असा दर मिळाला आहे.
– राजेंद्र कोरपे, बटाटा, व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड