पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पारनेरचे आमदार नीलेश लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश होणार असल्याची चर्चा सुरू झाली असताना लंके आणि शरद पवार यांची गुरुवारी भेट झाली. मात्र थेट पक्षप्रवेश झाला नाही. पवार यांच्या विचारसरणी मला नेहमीच मान्य आहे, असे लंके यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले. त्यामुळे ते मनाने शरद पवार यांच्यासमवेत असल्याचेही स्पष्ट झाले. दरम्यान, लंके यांनी पक्ष प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येईल, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळे लंके यांचा पक्ष प्रवेश तूर्त टळला असल्याचे पुढे आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर अजित पवार यांच्यासमवेत गेलेले आमदार नीलेश लंके राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यापूर्वी शरद पवार यांनी ही अफवा असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र शिरूरचे खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांनी लंके यांच्या भेटीनंतर ते पक्ष प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार डाॅ. अमोल कोल्हे यांच्या उपस्थितीत लंके यांनी लिहिलेल्या ‘मी अनुभवलेला कोविड’ या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते होणार असून ते जाहीर पक्ष प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र या तिघांंनी गुरुवारी पक्ष कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. मात्र प्रवेशाबाबत थेट बोलणे टाळले. त्यामुळे त्यांच्या पक्ष प्रवेशाबाबतचा संभ्रमही कायम राहिला.

हेही वाचा – महाविकास आघाडीचे अखेर ठरले! ‘हा’ पक्ष लढवणार बुलढाण्याची लोकसभा

घड्याळ की तुतारी?

‘तुमच्या हातात घड्याळ आहे की तुतारी ? असा थेट प्रश्न लंके यांना विचारण्यात आला असता ‘साहेब सांगतील तो आदेश’, असे सूचक उत्तर त्यांनी दिले. मात्र पक्ष प्रवेशाबाबत बोलणे टाळले. मी शरद पवार यांच्या विचारधारेबरोबर आहे. लहानपणापासूनच शरद पवार यांच्या नेतृत्वाचा आणि विचारांचा माझ्यावर पगडा आहे. करोना संकट काळातील अनुभवांवर लिहिलेल्या पुस्तकाचे प्रकाशन पवार यांच्या हस्ते व्हावे, अशी माझी इच्छा होती. त्यासाठी मी पुण्यात आलो आहे,’ असे लंके यांनी स्पष्ट केले.

विचारधारा आहे मग पक्षही एकच आहे का, असे विचारण्यात आले असता, विचारधारा आणि पक्ष एकच आहे. माझ्या कार्यालयातही पवार यांचे छायाचित्र आहे. मी कधीही शरद पवार यांच्याविरोधात टीकाटिप्पणी केलेली नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

हेही वाचा – माढ्यात भाजप उमेदवारीची झळ शिवसेना शिंदे गटाला; संपर्कप्रमुखाचा राजीनामा

लंकेंना सहकार्याचे शरद पवारांचे आश्वासन

पारनेर तालुक्यातील कष्टाळू कार्यकर्ते म्हणून लंके सर्वांना परिचित आहेत. ते आमच्या पक्ष कार्यालयात आले. त्यासाठी मी त्यांचे स्वागत करतो. यापुढे त्यांना कोणतीही मदत लागली तर त्यांना निश्चित सहकार्य केले जाईल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.

हेही वाचा – “मी कोरे पाकीट, जो पत्ता टाकला जाईल तिकडे पोहोचेल”, चंद्रकांत पाटलांकडून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याचे संकेत

…तर आमदारकी धोक्यात

लंके यांच्या पक्ष प्रवेशाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही बारामती दौऱ्यात प्रतिक्रिया दिली. लंके यांनी चुकीची भूमिका घेऊ नये. त्यांची चुकीची भूमिका घेतल्यास त्यांची आमदारकी धोक्यात येईल. पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली तर, पक्षांतर्गत बंदी कायद्यानुसार आमदारकी रद्द होते, अशी सूचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. त्यामुळे तांत्रिक अडचणींमुळेच लंके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश तूर्त टळल्याचे दिसत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to defection law the mla from nilesh lanke was prevented from joining the party pune print news stj 05 ssb
Show comments