दिवाळीच्या सणासाठी मूळ गावी जाणाऱ्या नागरिकांची सध्या एसटी आणि खासगी वाहतूकदारांच्या गाड्यांसाठी गर्दी दिसून येत आहे. प्रामुख्याने नागपूरला जाण्यासाठी मागणी वाढत असून, खासगी बससाठी पुणे-नागपूर दरम्यानचे भाडे अधिकृतपणे ३२०० रुपयांवर गेले आहे. त्याचप्रमाणे काही वाहतूकदार मनमानी पद्धतीने त्यापेक्षाही अधिक भाड्याची वसुली करीत असल्याच्या तक्रारी आहेत. दरम्यान, एसटीकडूनही पुणे-नागपूर मार्गावर जादा शिवनेरी बसची सुविधा देण्यात आली असून, त्यासाठी २४१५ रुपये भाडेआकारणी केली जात आहे.

हेही वाचा >>>“पुण्याचा विकास पाण्यातून…” भाजपाला ‘शिल्पकार’ म्हणत पुण्यातील पावसावरून जयंत पाटलांचा खोचक टोला

करोनाच्या काळामध्ये गेल्या दोन वर्षांत निर्बंध होते. त्यामुळे दिवाळीचा सण मोठ्या प्रमाणावर साजरा झाला नाही. सध्या कोणतेही निर्बंध नाहीत. त्यामुळे दिवाळीचा उत्साह मोठा आहे. त्यामुळे दिवाळीचा सण मूळ गावी साजरा करण्यासाठी जाणाऱ्यांची मागणी यंदा पूर्वीप्रमाणेच वाढली आहे. विदर्भ, मराठवाडा आदी भागांत जाणाऱ्यांची संख्या सध्या मोठी आहे. त्यामुळे एसटीच्या गाड्यांसह खासगी प्रवासी वाहतुकदारांच्या गाड्यांनाही मोठी मागणी आहे. मात्र, काही खासगी वाहतूकदारांकडून मनमानी पद्धतीने भाडेवसुली होत असल्याच्या तक्रारी करण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>“मशालीचा पहिला चटका महाराष्ट्राच्या दुष्मनांना बसला”, शिवसेनेचा भाजपा-शिंदे गटावर आसुड; म्हणाले, “अजून बरेच पोळायचे अन्…”

खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट होऊ नये आणि वाहतूकदारांनाही नुकसान होऊ नये, यादृष्टीने खासगी बसच्या भाड्याची निश्चिती काही वर्षांपूर्वी शासनाने केली आहे. त्यानुसार एसटी बसच्या तिकीटदरापेक्षा दीडपट भाडे आकारणी खासगी वाहतूकदाराला करता येते. त्यानुसार वाहतूकदारांकडून जाहीर करण्यात आलेला पुणे-नागपूर प्रवासाचा अधिकृत दर ३२०० रुपये आहे. पुणे-इंदोरसाठी २५००, बुलढाणा १८००, वेळगाव १८००, हुबळी २०००, गोवा १४०० आणि पुणे-अहमदाबाद प्रवासासाठी २५०० रुपयांचा दर खासगी वाहतूकदारांकडून जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातून जाताना गाड्या भरून जातात, मात्र परतताना प्रवासी मिळत नसल्याने काही प्रमाणात नुकसान होत असल्याचा मुद्दाही वाहतूकदारांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

हेही वाचा >>>पुणे : गरजूंच्या दिवाळी धान्यसंच वितरणात अडथळे

जादा गाड्यांसाठी एसटीचे तात्पुरते स्थानक

दिवाळीसाठी मराठवाडा, खान्देश, विदर्भात जाण्यासाठी एसटीच्या वतीने जादा गाड्यांचे नियोजन केले असून, त्यासाठी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेवर पुणे-मुंबई महामार्गालगत तात्पुरते स्थानक उभारण्यात आले आहे. या स्थानकातून १९ ते २३ ऑक्टोबर या कालावधीत आरक्षीत जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत. आरक्षणाची स्थिती पाहून गाड्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. एसटी स्थानक, खासगी केंद्र आणि ऑनलाइन पद्धतीने गाड्यांचे आरक्षण करता येणार असल्याने प्रवाशांनी एसटीच्या सुविधेला लाभ घ्यावा, असे आवाहन एसटीच्या पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांनी केले आहे.

Story img Loader