पुणे : दिवाळीच्या निमित्ताने खरेदीसाठी शहरभरात खरेदीसाठी होत असलेली गर्दी धनत्रयोदशीच्या दिवशीही कायम होती. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले. सणासुदीचा काळ सुरू झाल्यापासून खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी असल्याचे दिसून येत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागासह सिंहगड रस्ता, कोथरूड, मार्केट यार्ड आदी भागांमध्ये खरेदीसाठी सातत्याने नागरिकांची गर्दी होत आहे.
हेही वाचा : विश्लेषण : टी-२० विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान धोकादायक संघ… पण जगज्जेतेपदाची संधी किती?
विशेषतः गेल्या आठवडाभरात गर्दीमुळे अनेकदा वाहतूक कोंडी झाली. शहराच्या मध्यवर्ती भागात आधीच असलेल्या वाहनांमध्ये खरेदीसाठी आलेल्या नागरिकांच्या वाहनांची भर पडून वाहतूक कोंडी झाली. तुळशीबाग, लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, बाजीराव रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता या भागात वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून आले.
शनिवारी धनत्रयोदशीच्या दिवशीही हेच चित्र पाहायला मिळाले. शहरात ठिकठिकाणी खरेदीसाठी गर्दी झाल्याचे दिसून आले. मध्यवर्ती भागातील मंडई, तुळशीबाग परिसरात तर चालताही न येण्याइतकी गर्दी झाली होती. खरेदीसाठी येणारे नागरिक हे गर्दीच्या ठिकाणीही मोटारींमधून येत असल्याने गर्दीमध्ये भर पडत असल्याचे चित्र शहरात आहे. वाहतूक पोलीस रस्त्यावर दिसत असले, तरी वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे, त्यांना अशक्य होत आहे.