पुणे : तरुणांमध्ये अतिमद्यपानाचे अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे प्रमाण वाढले आहे. अतिमद्यपानाच्या सवयीमुळे ६० टक्के तरुणांना उतारवयात हा त्रास होण्याचा धोका अधिक आहे. मद्यपान हे ५० वर्षे आणि त्यावरील वयाच्या प्रौढांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे प्रमुख कारण ठरत आहे, असा इशारा अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.
रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या रुग्णांपैकी अतिमद्यपान करणाऱ्या ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या सुमारे १० पैकी ५ व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसची समस्या आढळून येते. अशा रुग्णांना सांधे प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची आवश्यकता भासते. प्रौढांमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिसच्या प्रकरणांमध्ये १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेष म्हणजे, २५ ते ३५ वयोगटातील ६० टक्के तरुणांना अतिमद्यपानामुळे वयाच्या पन्नाशीपर्यंत अव्हॅस्कुलर नेक्रोसिस होण्याची शक्यता वाढते, असे अस्थिव्यंगोपचारत्ज्ञ डॉ. आशिष अरबट म्हणाले.
तरुणांमध्ये खुब्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. अनेकांना अव्हॅस्कुलर नेक्रोसिसचे निदान होत आहे. त्यामागे स्टेरॉइड्सचा अतिवापर, हाड मोडणे, खुब्याचे हाड मोडणे, रेडिएशन उपचार आणि अतिमद्यपान अशी आहेत. अतिमद्यपान आणि अव्हॅस्कुलर नेक्रोसिस यांच्यात परस्परसंबंध आहे. अतिमद्यपानामुळे हाडांमधील रक्त प्रवाहावर परिणाम होऊन हाडातील ऊतींचा मृत्यू होतो. या विकाराच्या लक्षणांमध्ये सांधेदुखी आणि स्नायूंचा कडकपणा यांचा समावेश आहे. यात हाडाचे प्रत्यारोपण करण्याचा पर्याय रुग्णासमोर असतो. या प्रत्यारोपणानंतर रुग्ण पूर्ववत होऊ शकतो, असे अस्थिव्यंगोपचारतज्ज्ञ डॉ. राजन कोठारी यांनी सांगितले.
अव्हॅस्कुलर नेक्रोसिस म्हणजे काय?
अव्हॅस्कुलर नेक्रोसिसमध्ये रक्तपुरवठ्याअभावी हाडातील ऊती मरतात. यामुळे सांधेदुखीसह हाडे ठिसूळ होणे अथवा तुटणे, अशा समस्या निर्माण होतात. अतिमद्यपान आणि स्टेरॉइडचा वापर हा ६५ टक्क्यांपेक्षा अधिक व्यक्तींमध्ये अव्हॅस्कुलर नेक्रोसिससाठी कारणीभूत ठरतो. अतिमद्यपानामुळे हा विकार झालेले बहुतेक रुग्ण सहसा ५० वर्षे आणि त्याहून अधिक वयोगटातील असतात. मद्यपानामुळे सीरम ट्रायग्लिसराईड आणि कोलेस्टेरॉलची पातळी तसेच अस्थिमज्जामध्ये चरबी जमा होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढते. त्यातून हा विकार उद्भवतो.
प्रत्यारोपणाची आवश्यकता
खुब्याच्या सांध्याला अव्हॅस्कुलर नेक्रोसिसमध्ये झालेल्या रुग्णाच्या शारीरीक हालचालींमध्ये सुधारणा आणण्यासाठी खुबा प्रत्यारोपण हा एकमेव पर्याय आहे. जेव्हा शारीरिक उपचार, वेदनाशामक औषधे किंवा चालताना आधार घेण्यासारख्या उपचारांमुळे आराम मिळत नाही तेव्हा शस्त्रक्रियेचा विचार केला जातो. सध्या, सुपरपॅथ हिप रिप्लेसमेंट ही अव्हॅस्कुलर नेक्रोसिसच्या रुग्णांसाठी एक प्रभावी तंत्र ठरत आहे. यामध्ये एक लहान छिद्र पाडून शस्त्रक्रिया केली जाते. यात चिरफाड न केल्याने जवळचे स्नायू किंवा स्नायुबंधाचे नुकसान होत नाही. यामुळे बरे होण्याचा कालावधी कमी होऊन तो रुग्णालयातून लवकर घरी जातो. रुग्ण शस्त्रक्रियेनंतर कोणत्याही आव्हानांशिवाय त्यांच्या दैनंदिन कामांना पुन्हा सुरूवात करू शकतो.