गुजरातमधील आणंद येथे प्रशिक्षणासाठी जाताना वाटेत केलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने कात्रज डेअरीच्या दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोघांचा बसमध्ये झोपेतच मृत्यू झाल्याने ही बाब आणंदला पोहोचल्यावर लक्षात आली.
भालचंद्र बबन तावरे (वय ४६, रा. पाईट, ता. राजगुरूनगर) आणि नंदकुमार महादेव कोलते (वय ४८, रा. पिसर्वे, ता. पुरंदर) या दोघांचा मृत्यू झाला. इतर नऊ जणांवर उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांच्या प्रकृतीला आता धोका नाही, अशी माहिती त्यांचे सहकारी हनुमंत सांडभोर यांनी दिली. सांडभोर यांनी आणंद येथून दूरध्वनीवरून सांगितले की, कात्रज डेअरीचे बारा कामगार आणंद येथील राष्ट्रीय डेअरी विकास मंडळात प्रशिक्षणासाठी गेले होते. ते शनिवारी रात्री स्लीपर बसने पुण्याहून निघाले. वाटेत पुणे जिल्ह्य़ातच भाजे गावाजवळ एका धाब्यावर रात्री नऊच्या सुमारास त्यांनी जेवण केले. त्यानंतर मध्यरात्रीनंतर सर्वानाच उलटय़ांचा त्रास सुरू झाला. बस स्लीपर असल्याने सर्वच जण झोपेत होते. त्यामुळे इतरांना जास्त त्रास होत असल्याचे कोणाच्या लक्षात आले नाही. लोक उलटय़ा करण्यासाठी उठल्याचे मात्र लक्षात येत होते.
अशाच स्थितीत बस सकाळी अकराच्या सुमारास आणंदला पोहोचली. तिथे गेल्यावर तावरे व कोलते यांचा मृत्यू झाल्याचे समजले, सर्वानाच उलटय़ांचा त्रास झाला होता. सांडभोर यांनाही उलटय़ा झाल्या. मात्र, इतरांपेक्षा त्यांची प्रकृती चांगली आहे. त्यांनी धावपळ करून इतरांना उपचारासाठी आणंद येथील कृष्णा रुग्णालयात दाखल केले. इतरांची प्रकृती आता स्थिर आहे. ‘कात्रज’ चे व्यवस्थापकीय संचालक आणंदला जायला निघाले असून, ते गेल्यानंतर मृतदेह आणण्याचा निर्णय घेण्यात येईल, असेही सांडभोर यांनी सांगितले.
‘कात्रज’ च्या दोन कामगारांचा गुजरातेत विषबाधेमुळे मृत्यू
गुजरातमधील आणंद येथे प्रशिक्षणासाठी जाताना वाटेत केलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याने कात्रज डेअरीच्या दोन कामगारांचा मृत्यू झाला, तर नऊ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
First published on: 20-05-2013 at 02:39 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to food poisoning 2 workers of katraj dairy dead