लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: पुणे शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभर पावसाची संततधार सुरू होती. दुपारी पावसाने काहीशी उघडीप दिली होती. सायंकाळी पुन्हा पाऊस सुरू झाला. जिल्ह्यातील घाट परिसरात पावसाचा जोर कायम होता. आज, गुरुवारी जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ दिला असला, तरी पावसाचा जोर घाट परिसरातच राहण्याचा अंदाज आहे.
पुणे शहर आणि परिसरात बुधवारी दिवसभरात पावसाचा फारसा जोर नव्हता. हवेलीत ३ मिमी, शिवाजीनगरमध्ये ५.८ मिमी, पाषाणमध्ये ४.५ मिमी, वडगावशेरीत ३.५ मिमी आणि हडपसरमध्ये २.५ मिमी पाऊस झाला आहे. जिल्ह्याच्या घाट परिसरात मात्र, जोरदार पाऊस पडत आहे. लोणावळ्यात ९८ मिमी, लवासात ३९ मिमी, गिरिवन (मुळशी) १६.५ मिमी, निमगिरीमध्ये (जुन्नर) ७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या पूर्वभागतही पावसाचा फारसा जोर नव्हता.
आणखी वाचा-पिंपरी-चिंचवड शहर ‘खड्ड्यांत’
हवामान विभागाने पुढील दोन दिवस शहरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा इशारा दिला आहे. आज, गुरुवारी पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असला तरीही पावसाचा जोर घाट परिसरातच राहण्याचा अंदाज आहे. शनिवारी, २२ जुलै रोजी पावसाचा जोर कमी राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.