पुणे : राज्यात जुलै महिन्यात सर्वदूर झालेल्या अतिवृष्टीचा फटका सीताफळांना बसला आहे. सीताफळांच्या उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. जुलै महिन्यात झाडांना फुले येतात. मात्र, अतिवृष्टी, संततधार पावसामुळे पाणी जास्त होऊन फुले गळून पडल्यामुळे फळधारणेत घट झाली आहे.राज्यात कोकण वगळता सर्वत्र सीताफळांची लागवड आहे. प्रामुख्याने पुणे, सोलापूर, नगर जिल्हा आघाडीवर आहे. अन्य जिल्ह्यांत लागवड तुलनेने कमी आहे. राज्यात सीताफळांची लागवड सुमारे एक लाख हेक्टरवर आहे. जंगली किंवा नदी, ओढे, शेतीच्या बांधांवरील झाडांचा एकत्रित विचार करता ते ही साधारण एक लाख हेक्टरपर्यंत जाईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या बाजारात उन्हाळी बहरातील सीताफळे आहेत. उन्हाळी सीताफळांचा बहार अंतिम टप्प्यात आहे. १५ सप्टेंबरपर्यंत उन्हाळी बहरातील फळे बाजारात येतील. त्यानंतर मृग बहरातील फळांची आवक सुरू होऊन साधारण डिसेंबर महिन्यापर्यंत फळे बाजारात येतील. सध्या मृग बहरात सीताफळांना जुलै महिन्यात फुले येतात. नेमक्या याच काळात राज्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. संततधार पाऊस सुरू होता. त्यामुळे झाडांना पाणी जास्त झाले. पाणी साचून राहिल्यामुळे सीताफळाची फुले गळून पडली आहे. फुलांपासून फळधारणा होण्याच्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन सुमारे ३० टक्क्यांनी घटण्याचा अंदाज आहे. फळधारणा कमी झाली असली तरीही फळधारणा झालेल्या सीताफळांना चांगले पाणी मिळ्यामुळे फळांचा आकार वाढला आहे. त्यामुळे उत्पादन कमी निघाले तरीही फळे दर्जेदार आहेत.

हेही वाचा >>>पुण्यात अजित पवारांसमोरच वाजली तुतारी…

प्रक्रिया उद्योगाचा अभाव

राज्यात सीताफळ प्रक्रिया उद्योगाची संख्या जेमतेम ८० च्या घरात आहे. लहान आकाराची, पिकलेल्या सीताफळांचा वापर प्रक्रियेसाठी होतो. सीताफळांचा गर (पल्प) काढून वजा २० अंश सेल्सिअस तापमानाला साठविला जातो. हा गर वर्षभर कुल्फी, आईस्किम आणि रबडीसाठी वापरला जातो. सीताफळाच्या गराला चांगली मागणी असली तरीही अद्याप उद्योगाची व्याप्ती वाढलेली नाही, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सीताफळ संघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांनी दिली.

हेही वाचा >>>“तुम्ही सगळं मुख्यमंत्र्यांकडे ढकलून देऊ नका”! तरुणीच्या अर्जावरुन अजित पवारांनी पालिका आयुक्तांना खडसावलं

मृग बहरातील सीताफळांचा हंगाम सप्टेंबर अखेरपासून सुरू होऊन पुढील तीन महिने चालेल. प्रक्रियेसाठी सीताफळांना २५ ते ३५ रुपये किलोपर्यंत दर मिळतो. बाजारात मोठ्या आकाराच्या फळांना सुमारे ७० ते १०० रुपये. एक नंबरच्या फळांना सरासरी ४५ रुपये आणि तीन नंबरच्या फळांना सरासरी ३० ते ३५ रुपये दर मिळतो. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघून चार पैसे हातात राहण्यासाठी किमान ३० ते ३५ रुपये प्रति किलो दर मिळायला हवा. यंदा उत्पादनात ३० टक्क्यांपर्यंत घटीचा अंदाज आहे. मात्र, फळांचा आकार मोठा आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सीताफळ संघाचे अध्यक्ष  श्याम गट्टाणी यांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Due to heavy rains production of custard apple in maharashtra has decreased by up to 30 percent pune print news dbj 20 amy