पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराला जोडणाऱ्या मुळा नदीवरील वाकड ते बालेवाडी पुलाचे पुण्याकडील बाजूचे काम अपूर्ण असल्याची कबुली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. भूसंपादन न झाल्याने पूल आणि रस्ता वाहतुकीसाठी दीड ते दोन लाख वाहनचालकांना बालेवाडीला वळसा मारावा लागत आहे. दरम्यान, तडजोडीने जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे.
हेही वाचा >>>पुणे: मालमत्ता विवरणपत्र देण्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांची टाळाटाळ
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांना जोडणाऱ्या मुळा नदीवरील वाकड ते बालेवाडी पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. पुलाच्या कामासाठी २३ कोटी ६६ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून पुलाचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. मात्र पुण्याकडील बाजूच्या रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्यासंदर्भात आमदार महादेव जानकर यांनी विधिमंडळात त्याबाबतचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूसंपादनाअभावी पूल आणि रस्त्याचा वाहतुकीसाठी वापर होत नसल्याची कबुली दिली.
हेही वाचा >>>पुणे: तीन प्रवाशांच्या नमुन्यांचे जनुकीय क्रमनिर्धारण; अहवालाची प्रतीक्षा
बालेवाडी सर्वेक्षण क्रमांक ४६/४७ जवळ मुळा नदीवर पूल बांधण्याचे काम पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आर्थिक सहभागातून करण्यात आले आहे. या पुलामुळे ही दोन्ही शहरे कस्पटे वस्तीजवळ जोडली जाणार असून दोन्ही शहरातील नागरिकांना पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. या पुलाची एकूण लांबी १७५ मीटर, रुंदी ३० मीटर असून पोहोच रस्त्याची लांबी बालेवाडीच्या बाजूस २३.१३ मीटर आणि वाकडच्या बाजूला ३६.११ मीटर एवढी आहे. या रस्त्याच्या कामाचा कार्यआदेश पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड यांच्या मार्फत देण्यात आले आहेत. यासाठी एकूण ६५० मीटर लांबीचा सेवा रस्ता आहे. यापैकी ३५० मीटर लांबीच्या रस्त्याचे क्षेत्र तडजोडीने ताब्यात घेण्यात आले आहे. उर्वरित ३०० मीटर लांबीच्या रस्त्याचे क्षेत्र ताब्यात आलेले नाही. ही जागा तडजोडीने ताब्यात घेण्याची प्रक्रिया महापालिका प्रशासनाकडून सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.