दत्ता जाधव
पुणे : मागील खरीप आणि रब्बी हंगामात अवकाळी, अतिवृष्टी, गारपीट, वादळी वाऱ्यासारख्या नैसर्गिक आपत्तींमुळे राज्यात ६९ लाख ११ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहेत. परतीच्या पावसाने खरीप हंगामातील ४७ टक्के पिकांची हानी केली आहे.कृषी विभागाच्या नैसर्गिक आपत्ती विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामात जून २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या काळात नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील ३६ जिल्ह्यांपैकी ३४ जिल्ह्यांत ६६ लाख ३१ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यातही जून ते ऑगस्ट या काळात ३३.५२ लाख आणि सप्टेंबर ते ऑक्टोबर या परतीच्या मोसमी पावसाच्या काळात ३२.७९ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
रब्बी हंगामात मार्चमध्ये एक लाख २७ हजार हेक्टर, एप्रिलमध्ये एक लाख ५३ हजार हेक्टर आणि मेमध्ये ८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. नैसर्गिक आपत्तींमुळे रब्बी हंगामातील सुमारे दोन लाख ८० हजार हेक्टरवरील पिकांचे म्हणजे रब्बीतील सुमारे सहा टक्के पिकांचे नुकसान झाले आहे. राज्यातील रब्बी हंगामाचे क्षेत्र सुमारे ५० लाख हेक्टर आहे. नुकसानीच्या बाबत रब्बी हंगामाला काहीसा दिलासा मिळाला आहे.
परतीच्या पावसाचा ३३ लाख हेक्टरला फटका
राज्यात परतीचा पाऊस यंदा लांबला होता. सप्टेंबर ते ऑक्टोबर या दोन महिन्यांत ३४ जिल्ह्यांत अतिवृष्टी, गारपीट, पूरस्थितीमुळे काढणीला आलेल्या खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले होते. मराठवाडा, विदर्भात सोयाबीन पीक पावसाच्या पाण्यात बुडाले होते. सततच्या पावसामुळे कापूस काळा पडला होता. कांदा, कडधान्ये, भाजीपाला, फळपिकांचेही मोठे नुकसान झाले. पावसाचा डािळब, सीताफळांच्या बागांना फटका बसला होता. सीताफळांचे उत्पादन ५० टक्क्यांवर आले होते, तर निर्यातक्षम डािळबांच्या उत्पादनात मोठी घट झाली होती.
६६.३१ लाख क्षेत्राची हानी
राज्यात पेरणीयोग्य क्षेत्र १७४ लाख हेक्टर आहे. त्यापैकी खरीप क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आणि रब्बी क्षेत्र ५१.२० लाख हेक्टर आहे. मागील खरीप हंगामात ऊस वगळता १४३ लाख हेक्टरवर पेरणी झाली होती. त्यापैकी ६६.३१ लाख क्षेत्रावर नुकसान झाले होते. म्हणजे ४७ टक्क्यांहून अधिक क्षेत्राला नैसर्गिक आपत्तींमुळे थेट फटका बसला.